आकुर्डी । विशेष प्रतिनिधी । दि. २५ जून । पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने चिंचवड येथील वृध्दाश्रमामध्ये आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने थेट वृद्धाश्रमात कोविड १९ लसीकरण करण्यात आले . देडे दाम्पत्य गेल्या अनेक वर्षा पासून सेवाभावी भावनेने वृद्धांची सेवा करीत असून त्यांनी व्रुद्धाश्रमातील वृद्धांना व तसेच कर्मचाऱ्यांना कोविड १९ लस मिळणे बाबतची विनंती आमदार बनसोडे यांच्या कडे केली होती,त्यांच्या मागणीची तात्काळ दखल घेत आमदार बनसोडे यांनी मनपाच्या आकुर्डी रुग्णालयातील लसीकरण टीम घेऊन स्वतःच्या उपस्थितीत ३५ वृद्धांचे व १५ कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घेतले.
या वेळी आकुर्डी रुग्णालयाचे चे डॉ.विकास बोरकर, डॉ. सुप्रिया शेटे, डॉ. राहुल साळुंखे, परिचारिका शीतल खांडेकर, तुषार शेलकांदे यांनी लसिकरण मोहीम राबवली.
यावेळी आमदार बनसोडे यांनी वृद्धांच्या तब्येतीची विचारपूस केली तसेच वृध्दाश्रमातील कामकाज कसे चालते या बद्दल माहिती घेतली, उमेदीच्या काळात काबाडकष्ट करून कुटुंबाच्या व्यक्तीस वृद्धाश्रमात राहण्याची वेळ येते मोठे कष्टदायी असून कोणत्याही वृद्धास वृद्धश्रमात राहण्याची वेळ येणे योग्य नसून तरुणांनी व घरातील कर्त्या पुरुषाने आपल्या आई वडिलांची काळजी घेतली पाहिजे, सांभाळ केला पाहिजे, तसेच उतारवयात त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणे अपेक्षित आहे पण आज आपल्या मातापितांना वृद्धाश्रमात पाठविण्याची वृत्ती निर्माण झाली आहे हे समाजासाठी घातक असल्याचे मत आमदार बनसोडे यांनी व्यक्त केले , वृद्धांनी त्यांच्या अडचणी व समस्या सांगाव्यात त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मी तत्पर आहे , असे बनसोडे यांनी आश्वासित केले.
आमदारांनी तात्काळ आपल्या निवेदनाची दखल घेत लसीकरण केल्या बद्दल देडे दाम्पत्यांनी आमदार बनसोडे यांचे आभार मानले. व पिंपरी विधानसभा मतदार संघातील निराधार व्यक्तीना आम्ही वृद्धाश्रमात दाखल करून त्यांची सेवाभावी वृत्तीने सेवा करू अशी भावना देखील व्यक्त केली.
लसीकरण मोहीम कार्यकर्माचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते राहुल आडकर व प्रतीक इंगळे यांनी केले होते.