पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील इयत्ता ५ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात २५% ते ७५% दरांमध्ये सवलतीचे पीएमपीएमएल बस पास देण्यात यावेत, अशी ठोस मागणी चिंचवड विधानसभेच्या माजी आमदार अश्विनी जगताप यांनी प्रशासनाकडे केली आहे.
महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागामार्फत सदर योजना सध्या राबवली जात असून, विविध अटी-शर्ती आणि नियमांनुसार विद्यार्थ्यांना मोफत किंवा सवलतीच्या दरात बस पास देण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र, अनेक विद्यार्थी खडकी, पुणे, देहूरोड कॅन्टोन्मेंट परिसरातील शाळांमध्ये शिक्षण घेत असल्याने, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी जगताप यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
“शहरातील अनेक गरजू विद्यार्थी शिक्षणासाठी लांब अंतरावर प्रवास करतात. सवलतीचे बस पास उपलब्ध झाल्यास त्यांच्या पालकांवरील आर्थिक बोजा हलका होईल. शिक्षणाचा हक्क आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता ही योजना प्रभावीपणे राबवणे गरजेचे आहे,” असे जगताप यांनी स्पष्ट केले.
त्यामुळे महापालिकेने तातडीने आदेश देऊन या विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात बस पास सुविधा उपलब्ध करून द्यावी, असे निवेदनात म्हटले आहे.