आई शिरकाईला वंशजांचे आगळे-वेगळे साकडे..

पुणे (प्रतिनिधि) : शिरकोली ता. राजगड (वेल्हा) जि. पुणे येथे ( चैत्र शु.१) दि. १३ व १४ एप्रिल रोजी छत्रपतींचे कुलदैवत, राजेशिर्के घराण्याची कुलस्वामिनी तसेच अवघ्या रयतेचे आराध्य दैवत मोसे खोरेतील आई शिरकाई देवीचा यात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी शंभुपत्नी महाराणी येसुबाईंच्या माहेरकडील स्वराज्यनिष्ठ श्रीमंत गणोजीराजे पिलाजीराजे शिर्के यांचे वंशज मा. दिपकराजे शिर्के व मा. लक्ष्मीकांत राजे शिर्के यांनी आई शिरकाई देवीचे मनोभावे दर्शन घेत, सर्व देवीभक्तांना सुखी समृध्द व आनंदी ठेव अशी साद घालत, चित्रपटासह कथा- कादंबरीतून स्वराज्यनिष्ठ श्रीमंत राजेशिर्के घराण्याची बदनामी करणाऱ्यांना चांगली सदबुद्धी देण्यासाठी आई शिरकाई देवीला वंशजांनी भावनिक आगळे वेगळे साकडे घातले.

दोन दिवसीय यात्रोत्सवा दरम्यान यात्रा कमेटीने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यात प्रमुख्याने देवीचा अभिषेक, आरती, पूजाअर्चा, सकाळ संध्याकाळ दोन वेळेस महाप्रसाद, बगाड , पालखी मिरवणूक सोहळा, सांस्कृतिक कार्यक्रम, तमाशा आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याकामी यात्रा कमेटी, श्री शिरकाई देवी देवस्थान ट्रस्ट, शिरकोली ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल पडवळ व ग्रामस्थांनी नियोजन केले होते.

यावेळी छावा चित्रपटातील वादग्रस्त सिन विरोधात व चित्रपट टिमवर आवाज उठविणारे स्वराज्यनिष्ठ श्रीमंत पिलाजीराव राजेशिर्के प्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्याचे प्रमुख पदाधिकारी राष्ट्रवादीचे नेते तथा राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष वंशज दिपकराजे शिर्के, वंशज लक्ष्मीकांत राजे शिर्के तसेच चेतनराजे शिर्के, नवनाथ राजे शिर्के, कुमारजी पवार, चित्रकार मिलिंद विचारे, भागवत कळसकर आदीं मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांचा देवस्थान ट्रस्ट कडून सन्मान करण्यात आला. यात्रा उत्सवा दरम्यान राज्यभरातून शेकडो शिर्के परिवारासह हजारो भक्त मंडळी उपस्थित होते. यापुढे राजेशिर्के घराण्याची बदनामी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निश्चित केले. छावा चित्रपट टिमवर कायदेशीर लढाई चालु असून, बैठकीत विविध विषयावर सविस्तर चर्चा झाली.

आई शिरकाईच्या नावानं चांगभलं..!🙏🚩
जय शंभुराजे, जय येसुबाई, जय गणोजीराजे..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *