-संभाजीनगर, बर्ड व्हॅली येथील बैठकीमध्ये रवी लांडगे यांनी अजित गव्हाणे यांना जाहीर केला पाठिंबा
– रवी लांडगे उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेणार
भोसरी 3 नोव्हेंबर (प्रतिनिधी) :
भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांना माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.  रवी लांडगे सोमवारी (दि. 4 ) आपला उमेदवारी अर्ज माघारी घेणार असून त्यानंतर पूर्ण ताकदीनिशी अजित गव्हाणे यांच्या प्रचारार्थ मतदारसंघ पिंजून काढणार असल्याचे रवी लांडगे यांनी जाहीर केले.
संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली हॉटेलमध्ये रविवारी झालेल्या बैठकीत शिवसेना उपनेते सचिन अहिर , पिंपरी चिंचवड शहर प्रमुख सचिन भोसले ,भोसरी विधानसभेचे प्रमुख धनंजय आल्हाट , पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, केसरीनाथ पाटील, माजी आमदार गौतम चाबुस्कर, तुषार सहाणे,सचिन सानप आदी उपस्थित होते. यावेळी रवी लांडगे यांनी सोमवारी (दि. 4 ) आपला उमेदवारी अर्ज माघार घेणार असल्याची घोषणा केली.
भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित गव्हाणे यांना उमेदवारी जाहीर केली. दरम्यान शिवसेनेमध्ये नुकतेच प्रवेश घेतलेले रवी लांडगे हे देखील भोसरी विधानसभा मतदारसंघांमध्ये निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. वेळोवेळी रवी लांडगे यांनी जाहीर केले होते की गेल्या दहा वर्षांमध्ये भोसरी मतदारसंघाची झालेली पीछेहाट, प्रचंड भ्रष्टाचार आणि येथील दादागिरी विरोधात आपण लढत आहे. दरम्यान अजित गव्हाणे यांनी देखील याच मुद्द्यावर निवडणुकीचे रणशिंग फुंकले होते. उमेदवारी वाटपाच्या धोरणामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी मतदारसंघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला जाहीर झाला. आणि अजित गव्हाणे यांना उमेदवारी जाहीर झाली. यादरम्यान रवी लांडगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र आपला उद्देश एकच आहे. दोघांचे उमेदवारी अर्ज कायम राहिल्यास यातून महाविकास आघाडीचा तोटा आहे.हा मुद्दा लक्षात घेऊन रवी लांडगे यांनी अजित गव्हाणे यांना पाठिंबा देत आपला उमेदवारी अर्ज माघार घेणार असल्याचे सांगितले.
……..
रवी लांडगे यांच्या पाठिंब्यामुळे ताकद वाढणार
अजित गव्हाणे यावेळी बोलताना म्हणाले रवी लांडगे यांच्या पाठिंब्यामुळे भोसरी मतदारसंघांमध्ये निश्चितच महाविकास आघाडीची ताकद वाढणार आहे. रवी लांडगे यांच्या मागे तरुणांचे वलय आहे. तरुणांची शक्ती, शिवसेनेची ताकद आणि रवी लांडगे यांचा पाठिंबा यातून विजय नक्कीच सोपा होणार आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून या राज्यात आपल्या विचारांचे सरकार आणायचे आहे. ज्यातून राज्य पर्यायाने आपला मतदारसंघ प्रगतीपथावर न्यायचा आहे. भोसरी मतदारसंघातील गेल्या दहा वर्षात निर्माण झालेला विकासाचा बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे असेही गव्हाणे यावेळी म्हणाले.
……..
रवी लांडगे म्हणाले भोसरी मतदारसंघाचा विकास हे एकमेव उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही दोघे निवडणुकीच्या रणांगणात उभे आहोत. मात्र मतांचे विभाजन होऊ नये,  महाविकास आघाडीच्या उमेदवाराला यातून दगा फटका होऊ नये असा विचार करून पक्षश्रेष्ठींनी सांगितलेल्या सूचनेनुसार माघार घेतली आहे. आगामी काळात महाविकास आघाडी म्हणून अजित गव्हाणे यांचे काम करणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *