पॅरामेडिकल क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ‘आत्मनिर्भरतेचे एक नवीन पाऊल’ विषयावर शैक्षणिक सत्राचे आयोजन….

बार्टी, मोरया सामाजिक प्रतिष्ठान आणि लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप पॅरामेडिकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन…

सांगवी :- विकसित भारतासाठी देशातील तळागाळातील शेवटच्या  विद्यार्थ्यांपर्यंत व्यवसायाभिमुख शिक्षण  पोहचविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्दिष्ट आहे. त्यांचे हे स्वप्न साकार करण्यासाठी बार्टीसारख्या संस्थेच्या माध्यमातून सर्व घटकातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी आमची आहे व ती आपण निश्चितच पार पाडू, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), मोरया सामाजिक प्रतिष्ठान, लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप पॅरामेडीकल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने बजाज फिन्सर्वच्या सहकार्याने मोफत पॅरामेडिकल प्रशिक्षण, पॅरामेडिकल करिअर 2.0 आणि पॅरामेडिकल क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण युवा पिढीसाठी ‘आत्मनिर्भरतेचे एक नवीन पाऊल’ या विषयावर आधारित कौशल्य विकास व पॅरामेडिकल प्रशिक्षण शैक्षणिक सत्राचा उद्घाटन समारंभ आज (दि. 7 ऑक्टोबर) पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृह या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि युवकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि विपश्यना आनापानाने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनील वारे (IRAS) हे होते. याप्रसंगी प्रकल्पाचे विभागप्रमुख तथा उपजिल्हाधिकारी अनिल कारंडे, कार्यालयीन अधीक्षक प्रज्ञा मोहिते, प्रकल्प व्यवस्थापक महेश गवई, माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, माजी नगरसेवक सागर आंघोळकर, संतोष कांबळे, कायदा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष महेश डोंगरे, संस्थेचे ओ. एस. महेश सोनकांबळे, प्रकल्प समन्वयक संतोष चव्हाण, प्रीतम किरवे, मोरया प्रतिष्ठानच्या संचालक आरती फल्ले, मेघना ठाकूर, अमरसिंह आदियाल, शशिकांत दुधारे, संजय मराठे, गणेश जगताप, माजी नगरसेवक कुणाल वाल्हेकर, नरेश जगताप, रमेश काशी, दिलीप तनपुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना जगताप म्हणाले की, बार्टी संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळ्या कोर्सेसच्या माध्यमातून ५० ते ६० हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देतात. त्यांच्या माध्यमातून  आमच्याही विद्यार्थ्यांना कला, कौशल्य, प्रशिक्षणाचा फायदा व्हावा, हा आमचा या कार्यक्रमामागील उद्देश आहे. पुढील काळात आपल्या कॉलेजमधील ४० जागांची असलेली बॅच लवकरच सर्वांच्या साक्षीने चारशेची करू. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या विविध शैक्षणिक व प्रशिक्षण संस्थांच्या माध्यमातून आपल्याला तळागाळातील प्रत्येक घटकांपर्यंत विकास पोहचवायचा आहे. ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असेही ते यावेळी म्हणाले.

यावेळी मनोगत व्यक्त करताना बार्टी संस्थेच्या कार्यालयीन अधीक्षक प्रज्ञा मोहिते म्हणाल्या की, आपला व आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कोणापुढे हात पसरावा लागू नये यासाठी बार्टी संस्था प्रशिक्षण देण्याचे काम करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तळागाळातील घटकांना जे अधिकार दिले आहेत ते अधिकार तळागाळातील लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम बार्टी संस्था करते. प्रत्येकाला डॉक्टर किंवा इंजिनिअर होता येत नाही. मात्र समाजात कोणीही बेरोजगार राहणार नाही यासाठी आमची बार्टी संस्था काम करते. आणि या कामाला तळमळीने सहकार्य करणारे भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांनाही जाते.

प्रकल्पाचे विभागप्रमुख अनिल कारंडे म्हणाले की, तुम्ही बार्टीसारख्या मान्यताप्राप्त संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेत आहात. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला जे प्रमाणपत्र मिळणार आहे, त्या प्रमाणपत्राच्या आधारे खाजगी रुग्णालय, हेल्थ सेंटर, शासकीय रुग्णालय या ठिकाणी तुम्हाला नोकरी मिळू शकते. आम्ही फक्त प्रशिक्षण देत नाही तर प्रशिक्षणाबरोबरच प्रॅक्टिकल ज्ञान देतो. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर प्रमाणपत्राबरोबरच प्रॅक्टिकल नॉलेज घेणेही आवश्यक आहे. सध्या देशातच नव्हे तर परदेशातही पॅरामेडिकल स्टाफची आवश्यकता आहे. त्यामुळे तुमच्याकडे नोकरीच्या खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. आतापर्यंत आम्ही २५ हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्यातील सुमारे १६ हजार विद्यार्थी नोकरी करत आहेत. तर उर्वरित स्वतःचा व्यवसाय करीत आहेत. तर असेही विद्यार्थी आहेत की ज्यांनी प्रशिक्षण घेतले ते घरीच बसले आहेत. त्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला हे प्रशिक्षण घेऊन संधीचे सोने करायचे की घरी बसून संधी वाया घालवायची आहे.

दरम्यान या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ब्लडप्रेशर ऑपरेटर्सचे साहित्य वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमही सादर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *