निळ्या पूररेषेत बांधकामे असणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा
सांगवी – सांगवीतील पवना नदीलगतच्या निळ्या पूररेषेअंतर्गत असलेल्या निवासी आणि व्यावसायिक बांधकामांवरील कारवाईस अखेर पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह आज (मंगळवारी) स्थगिती दिली. भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या विनंतीवरून झालेल्या या निर्णयामुळे लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दरवर्षी नदीला पूर आल्यानंतर नदीपात्रा लगतच्या भागात पुराचे पाणी शिरते. त्यामुळे तेथील रहिवाशांना स्थलांतरित करावे लागते. पुराचा धोका असल्यामुळे निळ्या पूररेषेतील बांधकामामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती असल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने अतिक्रमण कारवाई करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला होता. या पार्श्वभूमीवर भाजपच्या शिष्टमंडळाने शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज तातडीने महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांची भेट घेऊन यासंदर्भात सविस्तर चर्चा करीत सदर कारवाई तातडीने स्थगित करण्याची विनंती केली.
विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत आजच्या बैठकीनंतर महापालिका प्रशासनाने कारवाईला स्थगिती दिली असून त्यामुळे निळ्या पूररेषेत येणाऱ्या लाखो नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
बैठकीस माजी महापौर उषा तथा माई ढोरे, माजी नगरसेवक हर्षल ढोरे, संतोष कांबळे, सुरेश भोईर, शारदाताई सोनावणे, राजू सावळे यांच्यासह सांगवी परिसरातील सर्व नागरिक बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सांगवीसह पिंपळे गुरव, रहाटणी, पिंपरी, काळेवाडी, वाकड या परिसरातील निळ्या पूररेषेत असलेल्या लाखो नागरिकांना महापालिकेच्या या कारवाईचा फटका बसणार आहे. या सर्वसामान्य नागरिकांच्या घरावर कोणतीही कारवाई करू नये, अशी मागणी करणारे निवेदन आयुक्तांना देण्यात आले.