चिखली परिसरातील उद्योजक;  गणपती मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा 
भोसरी (प्रतिनिधी) :  चिखली भागात मोठ्या प्रमाणात लघुउद्योग आहेत. हे उद्योजक, येथे येणारा नोकरदार वर्ग वाहतूक कोंडीमुळे त्रस्त आहे. या वाहतूक कोंडीमुळे येथील लघुउद्योग बाहेर पडण्याची भीती आहे. त्यामुळे चिखली भागातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ‘ॲक्शन प्लॅन’ तयार  करणार असल्याचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले.  वाहतूक कोंडीमुळे येथील बाजारपेठ, लगतचे रस्ते यांच्या दळणवळणावर परिणाम होत असल्यामुळे प्राधान्याने चिखलीतील वाहतूक कोंडी सोडविणे गरजेचे असल्याचेही गव्हाणे यावेळी म्हणाले.
चिखली गावठाण परिसरातील गणेश मंडळे, येथील उद्योजक, नागरिक यांच्याशी स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांनी गुरुवारी (दि १३ ) संवाद साधला. यावेळी नागरिकांनी वाहतूक कोंडीमुळे होत असलेल्या अडचणी मांडल्या. उद्योजकांनी वाहतूक कोंडीमुळे अनेकदा उत्पादित तसेच कच्च्या मालाची वाहतूक अडकून पडते.  त्यामुळे अनेकदा ‘प्रोडक्शन’ थांबवावे लागतात अशाही समस्या मांडल्या.  या वाहतूक कोंडीला सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील.  महापालिका,  पोलीस प्रशासनाची मदत घेऊन याबाबत ‘ॲक्शन प्लॅन’ तयार केला जाईल असेही अजित गव्हाणे म्हणाले. यावेळी
चिखलीतील सामाजिक कार्यकर्ते  विकास साने, यश साने, अमृत सोनवणे, जेष्ठ मार्गदर्शक विष्णुपंत नेवाळे, सोमनाथ मोरे , संदीप नेवाळे तसेच गणेश मोरे, खंडू मोरे, प्रभाकर ताम्हाणे, ॲड.भुजबळ, हनुमंत म्हेत्रे, माणिक म्हेत्रे, विजय म्हेत्रे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
अजित गव्हाणे म्हणाले, चिखली परिसरातील साने चौक, नेवाळे वस्ती, सोनवणे वस्ती,  शिवाजी महाराज चौक, कुदळवाडी, डायमंड चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. सततच्या या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक, नागरिक त्रस्त झाले आहेत. साने चौक परिसरातून येणारी वाहने तसेच देहू-आळंदी रस्त्याने जाणारी वाहने यामुळे चिखली गावठाणातील चौकातही वाहतूक कोंडी होते.  अशा समस्या नागरिक, सोसायटी धारक  यांनी मांडल्या.
साने चौक परिसरात दुकाने आणि हॉटेल संख्या बरीच आहे. येथे अनेकदा मनमानी पद्धतीने आडव्या गाड्या लावतात. त्यामुळे नागरिकांना वापरासाठी रस्ता अपुरा पडतो अशीही अडचण येथील नागरिकांची आहे.
मुख्य म्हणजे चिखली परिसरातील या वाहतूक कोंडीमुळे येथील लघु उद्योजकांच्या ‘प्रोडक्शन युनिट’वर मोठा परिणाम होत आहे. या भागांमध्ये अनेक लघुउद्योजक आहेत.  या लघु उद्योगांवर आपलया शहरातील हजारो नोकरदार वर्ग देखील अवलंबून आहे.  त्यामुळे या भागातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नाकडे प्राधान्याने  लक्ष देणे गरजेचे आहे. येथील लोकभावना लक्षात घेऊन महापालिका, पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस यांच्याशी समन्वय साधून वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ॲक्शन प्लान तयार केला जाईल असेही अजित गव्हाणे यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *