पिंपरी प्रतिनिधी :- पौष शुक्ल द्वादशी, विक्रम संवत २०८०, सोमवार २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्या येथे रामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या नवीन मंदिराच्या गर्भगृहात प्रभू श्रीरामांच्या बाल स्वरुपातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. अनेक वर्षांची प्रतिक्षा संपलेली असून प्रभू राम खऱ्या अर्थाने अयोध्येत विराजमान होत आहेत. देशभरात आनंद आणि उत्साहाच्या लहरी पसरलेल्या असून संपूर्ण देश जणु काही पुन्हा एकदा दिवाळी साजरी करत आहे. या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त पिंपरी येथील माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सकाळी ११ वाजता प्रभू श्री रामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यानंतर पिंपरी गावातील कारसेवक अतुल शिनकर, नंदकुमार सातुर्डेकर,संजय गायखे,अनिल देसले,नंदकुमार बलकवडे,अनिल कारेकर,राजेंद्र कापसे,गिरीश पंचारिया,प्रभाकर गायकवाड,अतुल ब्रम्हे,नवनाथ कल्याणकर यांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी मनोगत व्यक्त करताना वाघेरे म्हणाले कि, तीर्थक्षेत्र आयोध्या येथे होत असलेल्या रामलल्ला मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा आज संपूर्ण हिंदुस्थानात साजरा होत असताना पिंपरी गावातील कारसेवकांचा सन्मान करण्याचे मला भाग्य मिळत आहे. हिंदू धर्मातील श्री विष्णूंचे अवतार असलेले भगवान श्री राम यांचे अयोध्या हे जन्मगाव आहे. भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील शरयू नदीच्या काठावर वसलेले अयोध्या हे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हिंदू धर्मातील राम जन्मभूमीच्या पावन जागेवर बांधलेले हे राम मंदिर आहे.

सन १५२८ ते १५२९ या काळात मुघल सम्राट बाबरने, प्राचीन आणि भव्य राम मंदिर तोडून राम जन्म भूमीवर मशीद बांधली होती. हीच ती बाबरी मशीद, साधारण १५३० ते ६ डिसेंबर १९९२ पर्यंत ही मशीद अस्तित्वात होती. ६ डिसेंबर ला अयोध्येमध्ये जवळपास २ लाख कारसेवक पोहचून बाबरी मशीद पाडली गेली. यामध्ये अनेक कार सेवकांना मृत्यू आला तर काहीना अपंगत्व आले. या कारसेवकांमध्ये माझ्या गावातील व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचा सहभाग होता याचा मलाच नव्हे तर संपूर्ण गावाला व शहराला अभिमान आहे.९ नोव्हेंबर २०१९ रोजी सुप्रिम कोर्टाने २.७७ एकर जमिन भगवान श्री रामाचे जन्मस्थान असल्याची मान्यता दिली. आणि राममंदिराच्या उभारणीचा मार्ग मोकळा झाला. ५ ऑगस्ट २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामजन्मभूमीचे भूमिपूजन करण्यात आले आणि राम मंदिर बांधकामाला सुरुवात झाली. यामुळेच मागील ५०० वर्षापासून प्रलंबित असेलला रामजन्मभूमी वाद निकाली निघून आता पुन्हा नव्याने अतिभव्य श्रीराम मंदिर अयोध्येमध्ये उभारले गेले आहे. आणि त्याचा हा सोहळा ‘ न भूतो न भविष्यती ‘ अशा रीतीने साजरा होताना दिसत आहे.

२२ जाने २०२४ रोजी अयोध्या नगरी मध्ये प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे, संपूर्ण भारतभर नव्हे तर जगभर हा ऐतिहासिक सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्याच्या आपण सर्व जन नक्कीच या सोहळया साठी प्रत्यक्ष उपस्थित राहू शकत नसलो तरी आपआपल्या परीने घरी,मंदिरांमध्ये आपण हा सोहळा नक्कीच साजरा करतो आहे हि सर्वात आनंदाची बाब आहे.

कार्यक्रमाचे शेवटी सर्व नागरिकांना मंगल अक्षदांचे वाटप करून ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरामध्ये ग्रामस्थाच्या वतीने आरती करून अक्षदा अर्पण करण्यात आल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेखर आहिरराव यांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन युवा मंचाचे अध्यक्ष हरीश वाघेरे,अभिजित चव्हाण,किरण शिंदे,प्रशांत लोहार,रंजनाताई जाधव,शरद कोतकर,गणेश मंजाळ,विकी नाईक यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *