शतकोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण…
पिंपरी, पुणे (दि.२५ डिसेंबर २०२३) शहरांचा एकतर्फी विकास होत चालत नाही, तर साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्राचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिंपरी चिंचवड शहरात सांस्कृतिक, नाट्य चळवळ वाढविण्यास भाऊसाहेब भोईर यांनी गेली अठ्ठावीस वर्ष काम केले आहे. त्यामुळे शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा मान पिंपरी चिंचवड शहराला मिळाला आहे. हे नाट्य संमेलन संस्मरणीय ठरेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री तथा स्वागत समिती अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शंभरावे मराठी नाट्य संमेलन सहा आणि सात जानेवारी २०२४ रोजी पिंपरी चिंचवड शहरात होत आहे. यानिमित्त तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे अनावरण अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी आकुर्डी येथे करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, आमदार अण्णा बनसोडे, उद्योजक कृष्णकुमार गोयल, राजेश सांकला, डॉ. पी. डी. पाटील, माजी आमदार विलास लांडे, माजी महापौर योगेश बहल, माजी नगरसेवक प्रभाकर वाघेरे, अजित गव्हाणे, विठ्ठल काटे, शत्रुघ्न काटे, मयूर कलाटे आदी उपस्थित होते.
संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध चित्रपट निर्माते डॉ. जब्बार पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वागताध्यक्ष तर स्वागत समिती अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योग मंत्री उदय सामंत निमंत्रक आहेत. या संमेलनासाठी दहा कोटींचा निधी शासनाच्या वतीने दिला आहे. हा निधी संपूर्णपणे नाट्यसंमेलनासाठी वापरण्यात येणार नसून महाराष्ट्रातील नाट्य परिषदेच्या शाखांना ठराविक प्रमाणात त्याचे वितरण केले जाईल, तसेच नाट्य संमेलनातील खर्चातून जी रक्कम शिल्लक राहील त्याच्या व्याजातूनही ज्येष्ठ कलावंत, पडद्यामागील कलाकार, कामगार यांच्यासाठी आवश्यक ती मदत, आरोग्य विमा या स्वरूपात मदत केली जाईल, तसेच जिल्हा नियोजन समितीकडून २५ लाखांचा निधी देण्यात येणार आहे असे अजित पवार यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड शहराला शंभरावे नाट्य संमेलन घेण्याचा मान मिळाला आहे. ही एक ऐतिहासिक घटना आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे आपण सगळे साक्षीदार होणार आहोत. हा आपल्या शहरवासीयांसाठी गर्वाचा क्षण आहे. त्यासाठी शासकीय तसेच स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे असा विश्वास भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केला.
मराठी माणसाचे नाटकांवर जीवापाड प्रेम !!!
मराठी माणूस नाट्य वेडा आहे. त्याचे मराठी नाटकांवर जीवापाड प्रेम असून आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही नाटकांना गर्दी होते. मराठी माणूस आवर्जून नाटक पाहायला नाट्यगृहात जातो. तालुकास्तरावरही स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासनाच्या वतीने नाट्यगृह उभारण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल. नाटकांमधून केवळ मनोरंजनच नाही तर समाजाचे प्रबोधनही होते. समाजाचे प्रतिबिंब नाट्यकृती मध्ये उमटते, असे अजित पवार म्हणाले.
—————————————