अल्पसंख्यांक समाजाच्या मेळाव्यात नाना काटेंना विजयी करण्याचा संकल्प…
चिंचवड :- छत्रपती शिवाजी महाराजांसाठी प्राणाची बाजी लावणारा मदारी मेहतर हा मुस्लिम होता. अफझलखानाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी छत्रपतींना वाघनखे बनवून देणारा कारागीरही मुस्लिम होता. अठरापगड जाती-धर्मांच्या मावळ्यांची मोट बांधत शिवरायांनी स्वराज्याची उभारणी केली. मात्र त्यांना ‘गोब्राह्मण प्रतिपालक’ असे मर्यादित करण्याचा प्रयत्न भाजप आणि संघ परिवार करत आहे. हा प्रयत्न हाणून पाडण्याची गरज आहे. त्याची संधी चिंचवड पोटनिवडणुकीच्या निमित्ताने चालून आली आहे. त्यामुळे नाना काटे यांना विजयी करून जातीय तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजून घेणाऱ्या शक्तींचा पाडाव करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी केले.
थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयात पार पडलेल्या अल्पसंख्यांक समाजाच्या मेळाव्यात मिटकरी बोलत होते. यावेळी आमदार नीलेश लंके, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव सुभान अली शेख व्यासपीठावर उपस्थित होते. मिटकरी पुढे म्हणाले, ‘निवडणुका आल्या की यांना शिवाजी महाराज आठवतात. जातीय तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न केले जातात. हे प्रयत्न हाणून पाडण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या समन्वयवादी आणि लोकशाहीपूरक भुमिकेला पाठींबा देण्यासाठी नाना काटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा’, असे आवाहन मिटकरी यांनी केले.
आ. नीलेश लंके म्हणाले, ‘करोनाच्या काळात माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते जीव धोक्यात घालून नागरिकांना आरोग्य सुविधा आणि मदत पोहोचवण्यासाठी धडपडत होते. त्याचवेळी भाजपाची मंडळी मात्र मंदिर खुली करण्याच्या मागणीसाठी गर्दी जमवून संकटाची तीव्रता कशी वाढवता येईल, यासाठी प्रयत्न करत होते. या संकटातून बाहेर पडण्यासाठी भाजपाने उभारलेले एक आरोग्य केंद्र कुणाला माहित आहे का? राज्य सरकार त्यावेळचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली करोना उपचार केंद्रे उभारत होते, ती केंद्र बंद पाडण्यासाठी आणि लोकांना औषधे मिळू नयेत यासाठी औषधांची साठेबाजी करणारे कोण होते? याची जनतेला माहिती आहे. जनतेच्या आयुष्याशी खेळणाऱ्या या प्रतीगामी जातीयवादी शक्तींना पराभूत करण्यासाठी नाना काटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा’, असे लंके म्हणाले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले, ‘अल्पसंख्यांक समाजाला उचित सन्मान देण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे आपली शक्ती उभी करण्याची गरज निर्माण झाली आहे. अल्पसंख्यांक समाजाच्या न्याय हक्कांना डावलण्याचे काम भारतीय जनता पक्षाने सुरू केली आहे. आम्हाला कोणताही जातीय तणाव निर्माण करायचा नसतो. मात्र, वारंवार आमच्या श्रध्दास्थानांवर हल्ला करण्याचे प्रयत्न होत आहेत. असे प्रयत्न करणाऱ्या शक्तींना पराभूत करण्याची संधी या पोटनिवडणुकीत अल्पसंख्यांक समाजाला मिळाली आहे. या संधीचा लाभ घेत नाना काटे यांना विजयी करा आणि अल्पसंख्यांकांना त्रास देणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा पराभव करा.’
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव सुभान अली शेख म्हणाले, ‘हा देश जेवढा तुमचा आहे तेवढाच हा देश आमचाही आहे. येथे द्वेषाचे, तिरस्काराचे राजकारण चालणार नाही हे दाखवण्याची वेळ आली आहे. सामान्य माणूस दोन वेळच्या भाकरीसाठी त्रस्त असताना जातीय तणाव वाढवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करतो. सामान्य माणसांच्या चिता पेटवून त्या राखेवरील चुलीवर सत्तेची पोळी भाजणाऱ्या भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्याची संधी या निवडणुकीने निर्माण झाली आहे. त्यामुळे नाना काटे यांना विजयी करून जातीय तणाव निर्माण करणाऱ्या शक्तींना धडा शिकवा’, असे आवाहन त्यांनी केले.
या मेळाव्यास संघटक सचिव सुभान अली हलीमा शेख, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष इमरान शेख, माजी महापौर महंमदभाई पानसरे, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष फजलभाई शेख, अल्पसंख्यांकचे शहर अध्यक्ष युसुफभाई कुरेशी, उपाध्यक्ष शकुरूल्ला पठाण, कार्याध्यक्ष शहाजी आत्तार, इखलाख सय्यद, मौलाना अब्दुल गफ्फर शेख, अभिमन्यू पवार, सुनिल साळुंके, गोविंदराव पवार, राजेंद्रसिंग वालीया, जमुद्दीन पटेल, रशिद शेख, मुश्ताक शेख, अमोल गायकवाड, नजीर सय्यद, शौकत मुलानी, कमरून्नीसा शेख, आयशा शेख, माजी नगरसेविका माया बारणे, संतोष बारणे आदींसह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.