महाविकास आघाडीचे नाना काटेच निवडून येण्याचा पुनरुच्चार

चिंचवड: – चिंचवडची पोटनिवडणूक विकास कामांच्या आधारावर होत आहे. या शहराचा विकास कोणी केला आणि हे शहर भकास कोणी केले याची जनतेला कल्पना आहे. त्यामुळे काटे यांचा विजय मोठ्या फरकाने होईल, असा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

जयंत पाटील हे पिंपळे सौदागर येथे मतदारांशी संवाद साधत होते. यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, ‘सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून विरोधी पक्ष उद्ध्वस्त करण्याचे कारस्थान भाजपाने आखले आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या प्रसार माध्यमांवर इडी आणि आयकर विभागाची धाड टाकून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना जाब विचारण्याचे माध्यमांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे. अशावेळी जनतेलाच लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी निवडणुका हातात घ्याव्या लागतात. तशी चिंचवडची निवडणूक ही जनतेने हाती घेतली आहे. त्यामुळे फोडाफोडी करून आणि पैशाचा वारेमाप वापर करून विजयी होण्याचा भारतीय जनता पक्षाचे प्रयत्न यशस्वी होणार नाहीत. जनता राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना विजयी करतील’, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

शहरात भारतीय जनता पक्षाला एक कार्यकर्ता उभा करता आला नाही. त्यांना आमचे नेते आणि आमचे कार्यकर्ते चोरावे लागतात. ते शहराचा विकास काय करणार? असा सवाल करून जयंत पाटील म्हणाले, काहींनी केंद्रीय यंत्रणांच्या मदतीने शिवसेनेची चिन्हासकट चोरी केली. या दुष्कृत्यामुळे जनतेच्या मनात प्रचंड राग आहे तो मतपेटीतून व्यक्त होईल. त्यामुळे राष्ट्रवादी काँगेसचा विजय मोठ्या फरकाने होईल, असे पाटील म्हणाले.

करोनाची साथ असताना रस्त्यावर चिटपाखरू फिरत नसताना सत्तेत असणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी कुत्र्याच्या नसबंदी करून कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला. ज्यावेळी माणसांना एक वेळचे जेवण मिळत नव्हते. घराच्या बाहेर पडता येत नव्हते, तेव्हा या ठकांनी कुत्र्यांच्या नसबंदीत पैसे कसे मिळतील याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानातील जेवणाचे तीन महिन्याचा खर्च अडीच कोटी रुपये झाला आहे. जाहिरातीवर वारे माफ खर्च सुरू आहे हे सत्ताधारी कशात पैसा खातील आणि खर्च करतील याचा नेम नाही. त्यामुळे जनता या भ्रष्ट कारभाराने त्रस्त झाली आहे, एकीकडे विकासकामांना निधी उपलब्ध नसल्याचे सांगत काम स्थगित करायचे आणि दुसरीकडे नको तिथे कोट्यवधी रूपये खर्च दाखवून भ्रष्टाचार करायचा. त्यामुळे भ्रष्ट कारभाराला धडा शिकवण्याची संधी चिंचवड पोटनिवडणुकीच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना निर्माण झाली आहे. त्यामुळे नाना काटे यांना विजयी करून भाजपच्या भ्रष्ट सरकारला कायमचे घरी बसवा, असा प्रतीहल्ला जयंत पाटील यांनी चढवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *