पिंपरी, 14 फेब्रुवारी :- चिंचवड विधानसभा मतदारसंघात विविध प्रश्न प्रलंबित आहेत. अनेक वर्षांपासून हे प्रश्न रेंगाळलेत. करदात्यांना मागील तीन वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. या सर्व प्रश्नांमुळे पिचलेल्या नागरिकांना आता चिंचवडमध्ये बदल हवा आहे. त्यासाठी जनतेनेच पोटनिवडणूक हातात घेतली असून प्रचारादरम्यान आपल्याला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी सांगितले.

शिट्टी चिन्हावर निवडणूक लढवत असलेल्या राहुल कलाटे यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. युवकांची मोठी फळी कलाटे यांच्यामागे उभी आहे. महिला, पुरुष, ज्येष्ठांपासून नवमतदार युवक-युवतींचा कलाटे यांना प्रतिसाद मिळत आहे. कलाटे हे उच्चशिक्षित आणि व्हिजन असलेले उमेदवार असल्याने महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेले नवमतदार, तरुण त्यांच्यामागे उभे आहेत.

चिंचवड मतदारसंघातील विकासात समतोल साधल्याचे दिसत नाही. मतदारसंघातील अनेक भागात मुलभूत सुविधांची वानवा आहे. भाजपने चोवीस तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले होते. चोवीस तास नव्हे दररोज पाणी देण्याऐवजी दिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. मागील साडेतीन वर्षांपासून चिंचवडकरांना दिवसाआड पाणीपुरवठ्याला सामोरे जावे लागत आहे. पवना धरणात मुलबक पाणीसाठा असूनही केवळ नियोजन नसल्याने दररोज पाणीपुरवठा होत नाही. याबाबत सातत्याने महापालिका सभागृहात आवाज उठविला. हे प्रश्न पोटतिडकीने मांडत होतो. परंतु, सत्तेत मश्गूल असलेल्या भाजपने जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. राष्ट्रवादी काँग्रेसनेही चोवीस तास पाणीपुरवठ्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्याही काळात चोवीस तास पाणी शहरवासीयांना मिळाले नाही, असे कलाटे म्हणाले.

प्राधिकरणाकडील घरे महापालिकेअंतर्गत आली आहेत. ही घरे मूळ राहत असलेल्या नागरिकांच्या नावाने होणे आवश्यक आहे, अशा नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत राहुल कलाटे लोकांशी चर्चा करतात. प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याबाबतचे नियोजन सांगतात. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्याची धमक आणि ताकद कलाटे यांच्यात असल्याचा विश्वास मतदारांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळे चिंचवडची पोटनिवडणूक जनतेने हातात घेतली असून कलाटे यांनाच आमदार करण्याचा निर्धार केला आहे. कलाटे ज्या भागात जातात, तेथील जनता उत्स्फुर्तपणे त्यांचे स्वागत करते. राहुलदादा यावेळी आम्ही तुम्हालाच मतदान करणार असा विश्वास देतात. दोनवेळा संधी हुकल्याने राहुल कलाटे यांच्याबाबत मतदारांमध्ये मोठी सहानुभूती असल्याचे स्पष्टपणे दिसते.

शहरातील कायदा सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. नागरिक भितीच्या सावटाखाली जगत आहेत. महापालिकेच्या शाळांचा दर्जा घसरला आहे. मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्न मार्गी लावणार आहे. जनता माझ्याकडे आशेचा किरण म्हणून बघते. जनतेला आपल्याबाबत सहानुभूती असल्याचे प्रचारादरम्यान ठिकठिकाणी दिसत आहे. त्यामुळे जनतेच्या आर्शिवादाने माझा विजय नक्की असल्याचे” कलाटे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *