पिंपरी, दि.१५ :– चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाठिंबा जाहीर केल्याबद्दल भाजप व मित्रपक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले व त्यांच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. पतीच्या निधनाचे दुःख अजून विरलेही नसताना पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ माझ्यावर आली. अशा कठीण प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्या पक्षाचे प्रमुख राज ठाकरे हे मोठ्या भावासारखे माझ्या पाठीशी उभे राहिले आहेत. त्यांच्या या पाठिंब्याबद्दल मी त्यांची कायम ऋणी राहीन, अशा भावना अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी व्यक्त केल्या आहेत.

यासंदर्भात अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, “माझे पती आणि शहराच्या विकासाचे शिल्पकार आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी रोजी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे आम्हा जगताप परिवारावरच नाही तर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकांवर दुःखाचे डोंगर कोसळले. या दुःखातून सावरण्यासाठी राज्यातील आणि शहरातील अनेक नेत्यांनी, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व नागरिकांनी आम्हाला आधार दिला. आमच्या कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनीही आमच्या घरी येऊन दिवंगत लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच माझ्याशी संवाद साधून कोणत्याही प्रसंगात भावासारखे पाठीशी उभे राहण्याचे वचन त्यांनी मला दिले होते.

राज ठाकरे यांनी मला दिलेले हे वचन आज पाळले आहे. कारण त्यांनी पोटनिवडणुकीत भाजपाला म्हणजे मला पाठिंबा जाहीर केला आहे. मनसेचे नेते अनिल शिदोरे, बाबू वागस्कर, किशोर शिंदे यांनी भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, पक्षाचे प्रवक्ते एकनाथ पवार आणि प्रदेश सदस्य अनुप मोरे यांच्यासोबत बैठक घेऊन मनसेचा पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे हे राज्यातील एक मोठे नेते आणि मनही मोठे असणारे नेते आहेत. त्यांच्यातील मोठेपणामुळेच चिंचवड पोटनिवडणुकीत मला त्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. त्याबद्दल मी राज ठाकरे यांची कायम ऋणी राहीन.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *