पिंपरी, दि.१४ – चिंचवड मतदारसंघातील पोटनिवडणूक महिलांनी हातात घेतली आहे. मतदारसंघातील प्रत्येक महिला भाजपला विजयी करून मतदानाची ताकद दाखवणार, असा विश्वास भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय (आठवले गट), रासप, शिवसंग्राम संघटना, रयत क्रांती संघटना, प्रहार संघटना या महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी मंगळवारी (दि.१४) व्यक्त केला.
अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी पिंपळेनिलख भागात घरोघरी जाऊन महिलांशी संवाद साधला. काही भागात त्यांनी कोपरा सभाही घेतल्या. यावेळी माजी नगरसेविका आरती चोंधे, सुजाता पालांडे यांच्यासह भाजप व मित्रपक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
एक महिला आपल्या पतीच्या निधनाचे दुःख बाजूला सारून अवघ्या १५ ते २० दिवसांतच आमदारकीच्या निवडणुकीला सामोरे जात असल्याचा शहरातला पहिलाच प्रसंग शहरवासीय अनुभवत आहेत. त्यामुळे अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्याबद्दल मतदारांमध्ये प्रचंड सहानुभूती निर्माण झाल्याचे चित्र आहे. विशेषतः महिला मतदारांमध्ये भाजप व मित्रपक्षाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्याबद्दल विशेष कुतूहल निर्माण झाल्याचे दिसत आहे. महिला मतदारांच्या बोलण्यातून अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्याबद्दल उत्सुकता आणि औत्स्युक्य या दोन्ही गोष्टी जाणवत आहेत. त्यातूनच अश्विनी जगताप यांना महिलां मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जागोजागी महिलांचा मिळणारा प्रतिसाद यामुळे अश्विनी लक्ष्मण जगताप यांचाही उत्साह वाढला आहे. त्यांनी जोमाने प्रचार करून मतदारसंघात आघाडी घेतल्याचे चित्र आहे.
अश्विनी जगताप यांनीही माझी निवडणूक महिलांच्या हातात असल्याच्या भावना महिला मतदारांसमोर व्यक्त केल्या. माझे पती दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत मतदारसंघाच्या विकासासाठी काम केले. त्यांनी घेतलेला मतदारसंघाच्या विकासाचा वसा आणि वारसा निरंतर सुरू ठेवण्यासाठी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी महिला मतदारांना केले. महिला प्रत्येक निवडणुकीच्या केंद्रस्थानी असतात. महिला जर पेटून उठल्या तर काय करु शकतात हे दाखवून देण्याची संधी या निवडणुकीत आली आहे. महिलाच निवडणुकीच्या निकालांचे परिणाम बदलू शकतात. आताच्या पोटनिवडणुकीत माझ्यासारख्या भगिनीला भरघोस मतांनी निवडून देऊन महिला स्वतःची ताकद दाखवून देतील, असा विश्वासही अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी यावेळी व्यक्त केला.