चिंचवड : महाराष्ट्रातील दोन जागांसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कसबापेठ मतदारसंघाच्या भाजप आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक होणार आहे. यातच पिंपरी चिंचवडच्या पोटनिवडणुकीची चर्चा मात्र चांगलीच रंगली आहे.

पिंपरी चिंचवडच्या आमदार पदासाठी बिनविरोध निवड व्हावी अशी भाजपची रणनीती आहे. परंतु या जागेसाठी इतर पक्षातील काही कार्यकर्तेही इच्छूक आहेत. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्‍विनी जगताप नाहीतर त्यांचे बंधु शंकर जगताप यांच्या नावाची भाजप वर्तुळात चर्चा सुरु झाली आहेत. त्यामुळे येत्या काळात शंकर जगताप यांना बिनविरोध निवडून आणण्याचे भाजपचे प्रयत्न चालू आहेत. तर, राष्ट्रवादीकडून नाना काटे, भाऊसाहेब भोईर, मोरेश्‍वर भोंडवे, शिवसेनेचे राहुल कलाटे, नवनाथ जगताप यांच्या नावाचीही चर्चा सुरु आहे.

भाजपकडून जगताप यांच्या पत्नी अश्‍विनी जगताप आणि बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. तर, भाजपच्या रहाटणीतील माजी नगरसेवक चंद्रकांत नखाते यांच्या नावाची देखील नागरिकांमधून दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे . गेल्या ३० वर्षांचा राजकीय अनुभव असणारे चंद्रकांत नखाते लक्ष्मण जगताप यांचे निकटवर्तीय आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या नावाची चांगलीच चर्चा होत आहे.

जनतेशी असणारा थेट संपर्क आणि विविध उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जोपासणारा नेता आणि तगडा अनुभव अशी त्यांची ओळख आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीत चंद्रकांत नखाते यांच्या नावाची वर्णी लागण्याची शक्यता दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ”coming soon mla”, ”भावी आमदार”, ”जब समय आयेगा तो सबसे बडा छलांग हम हि मारेंगे” अशा पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यामुळे येत्या काळात राजकीय चिन्ह बदलण्याची शक्यता दिसत आहे.

कालच निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची अधिसूचना जाहीर केली. या निवडणूकीसाठीची अधिसूचना ३१ जानेवारी रोजी जारी करण्यात येणार असून ७ फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असणार आहे. ८ फेब्रुवारीला अर्जांची छाननी होईल. १० फेब्रुवारी पर्यंत अर्ज परत घेता येणार आहे. या दोन्ही पोटनिवडणूकांसाठी मतदान २७ फेब्रुवारी रोजी होईल. निकाल २ मार्च रोजी जाहीर होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *