व्यापाऱ्यांनी केले शगुन चौकात ठिय्या आंदोलन…
पिंपरी, पुणे (दि. १२ जानेवारी २०२३) पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाकडून पिंपरी कॅम्प मध्ये कारवाई करीत असताना व्यापाऱ्यांशी वाद झाला. यानंतर व्यापाऱ्यांनी  अधिकाऱ्यांचा निषेध करीत दुकाने बंद करून शगुन चौकात ठिय्या आंदोलन केले. गुरुवारी सकाळी अतिक्रमन विरोधी पथकाने पिंपरी कॅम्प परिसरात अतिक्रमण कारवाई सुरू केली. यावेळी पथकातील सुरक्षा रक्षकांनी व्यापाऱ्यांवर लाठीचार्ज केला आणि दुकानात घुसून कर्मचाऱ्यांना देखील धक्काबुक्की करीत त्रास दिला असा आरोप पिंपरी चिंचवड मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी केला. मनपा अधिकाऱ्यांचा निषेध करीत दुपारी बारानंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करून शगुन चौकात ठिय्या  आंदोलन केले. यावेळी ‘अ’  प्रभाग क्षेत्रिय अधिकारी सुचिता पानसरे यांनी श्रीचंद आसवानी, माजी उपमहापौर हीरानंद उर्फ डब्बू आसवानी, माजी नगरसेविका सीमाताई सावळे, आशा शेंडगे आणि व्यापारी प्रतिनिधींशी आंदोलन मागे घेणे विषयी संवाद साधला. यानंतर व्यापारी शगुन चौकातून मोर्चा काढून मनपा भवना समोर आले. नंतर श्रीचंद आसवानी, डब्बु आसवानी, सीमाताई सावळे, आशा शेंडगे, रोमी संधू, निरज चावला, नारायण पोपताणी,  शाम मेघराजानी यांच्या शिष्ट मंडळाने अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांना भेटून निवेदन दिले.
यावेळी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना पिंपरी चिंचवड मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांनी सांगितले की, महानगरपालिकेने कारवाई करण्यास आमचा विरोध नाही. परंतु व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण करणारे व व्यापाऱ्यांवर लाठीचार्ज करणारे कृत्य अधिकाऱ्यांनी व कर्मचारी करू नये. आज झालेल्या कारवाई वेळी सुरक्षारक्षकांनी व्यापाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना दुकानात घुसून मारले आहे. याबाबतचे व्हिडिओ शूटिंग अधिकाऱ्यांना आम्ही दिले आहे. महानगरपालिकेने पिंपरी कॅम्प व परिसरातील पदपथांवर असलेले अतिक्रमण काढावे अशी आम्ही वेळोवेळी मागणी केली आहे. याकडे दुर्लक्ष करीत अधिकारी बेकायदेशीर असणाऱ्या पथारी वर कारवाई करण्याऐवजी अधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व कर भरणाऱ्या व्यापाऱ्यांना त्रास देऊन त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे.
माजी उपमहापौर डब्बू आसवानी यांनी सांगितले की, व्यापाऱ्यांनी जर पदपथावर अतिक्रमण केले असेल तर त्या व्यापाऱ्यांना पाच, दहा हजार रुपये दंड करावा. असे केल्यास ते व्यापारी पुन्हा अतिक्रमण करणार नाही. तसेच बेकायदेशीरपणे रस्त्यावर बसून दुकानदारांना त्रास होईल अशा पद्धतीने व्यवसाय करणारे पथारी व्यवसायिकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी व्यापाऱ्यांच्या वतीने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *