पिंपरी (दिनांक :१२ जानेवारी २०२३):- “समाजकारण आणि राजकारणाची पातळी घसरली असलीतरी कवी हे सांस्कृतिक संचित असून त्यांच्यामुळे महाराष्ट्राची सुसंस्कृत अशी ओळख टिकून आहे!” असे गौरवोद्गार माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी आचार्य अत्रे रंगमंदिर, पिंपरी येथे बुधवार, दिनांक ११ जानेवारी २०२३ रोजी काढले. संवेदना प्रकाशननिर्मित आणि कवी सूर्यकांत भोसले लिखित ‘शब्दधून’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना भाऊसाहेब भोईर बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक प्रदीप गांधलीकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, राज अहेरराव, प्रकाशक नितीन हिरवे यांची प्रमुख उपस्थिती होती. श्रीकांत चौगुले यांनी, “शासकीय अधिकारी म्हणून सेवा करूनही सूर्यकांत भोसले यांनी आपली संवेदनशीलता जपली असून ‘शब्दधून’ या कवितासंग्रहातून त्यांनी विविध काव्यप्रकार हाताळले आहेत. त्यामुळे त्यांचा काव्यछंदाचा अभ्यास प्रकट होतो!” असे मत मांडले. याप्रसंगी कृतज्ञतापर मनोगत व्यक्त करताना कवी सूर्यकांत भोसले यांनी, “साहित्यसाधना आणि विविध भाषांचा अभ्यास करीत असतानाच मी अध्यात्माचीही साधना केली. त्यामुळे अंतरंगातील अफाट विश्वाची अनुभूती मला झाली!” अशा भावना व्यक्त करून ‘शब्दधून’मधील वेगवेगळ्या आकृतिबंधातील काव्यरचना सादर करीत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अध्यक्षीय मनोगतातून प्रदीप गांधलीकर यांनी, “शब्दांचे सामर्थ्य अफाट असून या विश्वातील अनाहत नादाशी त्यांचा असलेला अनुबंध ‘शब्दधून’ या कवितासंग्रहातून उलगडण्याचा प्रयत्न कवी भोसले यांनी केला आहे!” असे विचार व्यक्त केले. प्रकाशन सोहळ्यानंतर ज्येष्ठ कवी मधुसूदन घाणेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कविसंमेलनात बंडा जोशी, अनिल दीक्षित, सीताराम नरके, सीमा गांधी, अनंत गोगले, आनंद गायकवाड, संकेत खांडगे, पल्लवी येवले, अरुण कांबळे, अशोक भांबुरे, राहुल भोसले, आशा शिंदे, उद्धव महाजन, रमेश पिंजरकर, राजेंद्र चौधरी, नितीन शिंदे, मकरंद घाणेकर, जगदीप वनशीव या कवींनी आशयघन कवितांचे सादरीकरण केले. प्रा. विजय लोंढे यांनी कविसंमेलनाचे तर योगिता पाखले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *