पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील नियमबाह्य बांधकाम बांधकामांवर लादलेला शास्तीकर पूर्ण माफ करण्याची ऐतिहासिक घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनात केली. या निर्णयाचे स्वागत करत शहर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोष आणि आनंदोत्सव साजरा केला.

भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये शास्तीकर पूर्ण माफ करण्याबाबत लक्षवेधी मांडली होती. या लक्षवेधीला उत्तर देताना राज्य सरकारने शास्ती कर पूर्ण माफ करण्याची घोषणा केली. या निर्णयाचे पिंपरी- चिंचवडकरांकडून स्वागत करण्यात आले.

मोरवाडी येथील भाजपाच्या मध्यवर्ती जनसंपर्क कार्यालयासमोर शास्तीकर माफीचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, चिंचवड विधानसभा प्रभारी शंकर जगताप, सरचिटणीस राजू दुर्गे, मोरेश्वर शेडगे, विजय फुगे, युवा मोर्चा शहराध्यक्ष संकेत चोंधे आणि सर्व माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके म्हणाले की, दि.४ जानेवारी २००८ रोजी तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारने पिंपरी-चिंचवड करांवर शास्तीकर लादला होता. गेल्या १४ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शास्तीकराच्या मुद्याचे केवळ राजकारण केले. २०१९ मध्ये सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारनेसुद्धा अडीच वर्षाच्या काळात शास्तीकराचा प्रश्न मार्गी लावला नाही. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी आज तमाम पिंपरी चिंचवड करांची भावना विधिमंडळामध्ये अत्यंत प्रखरपणे मांडली. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेत पिंपरी चिंचवड शहरातील शास्ती कर पूर्णपणे माफ करण्याचा निर्णय घेतला.

पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने राज्य सरकारचे आभार…
पिंपरी-चिंचवडमधील सुमारे एक लाख मिळकतधारकांवर लादलेला शास्तीकर आणि अनधिकृत बांधकामवरील कारवाईची टांगती तलवार आता दूर झाली आहे. शिंदे फडणवीस सरकारने शहरातील नागरिकांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला. तसेच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला लघु उद्योजकांच्या तसेच औद्योगिक मिळकतीवरील शास्तीचा प्रश्नही आता सुटला आहे. त्यामुळे तमाम पिंपरी-चिंचवडकरांच्या वतीने राज्य सरकारचे आणि शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आभार व्यक्त करते. अशा भावना माझी महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *