पिंपरी: चंद्रकांत पाटील यांच्यावर काल झालेल्या शाई प्रकरणात आयबीएन लोकमतचे पत्रकार गोविंद वाकडे यांचा हात आहे असे म्हणून त्यांच्यावर राजकीय दबावापोटी कारवाई होत असल्याचे दिसून येत आहे. हि कारवाई थांबिण्यात यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड पत्रकार संघाच्या वतीने पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी पिंपरी चिंचवड पत्रकार संघ अध्यक्ष अनिल वडघुले, श्रमीक पत्रकार संघ अध्यक्ष सुनिल लांडगे, सोशल मीडिया अध्यक्ष सुरज साळवे, सहसचिव प्रविण शिर्के, विभागीय सचिव नानासाहेब कांबळे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, सामचे गोपाल मोटघरे, प्रशांत साळुंखे, पत्रकार हल्ला कृतीचे अनिल भालेराव, चौथा स्तंभ पत्रकार संघ अध्यक्ष विकास कडलक, अमोल शिंत्रे, अमोल काकडे, विनोद पवार, राम बनसोडे, ज्येष्ठ पत्रकार बापु गोरे, शहर पत्रकार संघ अध्यक्ष दादा आढाव, सुनिल पवार, मुझफ्फर इनामदार, राकेश पगारे, गोपी पांडे यांसह शेकडो पत्रकार उपस्थित होते.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपयुक्त पाटील व सहाय्यक आयुक्त प्रेरणा कुट्टे, चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे करीत आहेत. काल रात्रीपासून वाकडे यांना फक्त पोलीस स्टेशन मध्ये बसून ठेवण्यात आले आहे. कसलीही विचारपूस करण्यात आलेली नाही किंवा कोर्टात हजार करण्यात आलेले नाही. पत्रकरांनी पोलिसांना या संदर्भात विचारपूस केली असता. फक्त तपास सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे. अशाप्रकारे राजकीय दबावाखाली पोलिसांनी पत्रकारांवरती गुन्हा दाखल करणे संपूर्ण चुकीचे असून याबाबत सर्व पत्रकारांनी संतापजनक व निषेधा निषेधार्ह भावना व्यक्त केल्या आहेत.
पत्रकारिता करणं गुन्हा आहे का ? – एस. एम. देशमुख
सारंच कठीण आहे…पत्रकारिता करणं गुन्हा आहे का? किमान सत्ताधाऱ्यांना तसं वाटतंय.. चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर शाई फेकण्याचा जो प्रकार घडला त्याचा प्रत्येक सूज्ञ आणि लोकशाही प्रेमी व्यक्ती निषेधच करील.. मात्र या शाईफेक प्रकरणाचं खापर पत्रकारांवर फोडून त्यांच्यावर अटकेची कारवाई करणं संतापजनक आणि निषेधार्ह आहे.
चंद्रकांत पाटील म्हणतात, “शाईफेक प्रकारचं छायांकन एवढं व्यवस्थित कसं केलं गेलं? एवढा अचूक अँगल कसा घेतला गेला? म्हणजे तो पत्रकारच शाईफेक प्रकरणामागचा मासटरमाईंड आहे.. त्याला अटक झाली नाही तर मी पोलीस स्टेशन समोर उपोषण करतो” ..
दादा, बातमी आणि छायाचित्र टिपणं हे पत्रकारांचं कामच आहे.. ते पत्रकाराने अचूकपणे केलं असेल तर पत्रकाराला तुम्ही मास्टर ठरवता? अनेकदा दंगली घडताना, मारामारी, मर्डर होत असताना पत्रकार घटनास्थळावर हजर असतात म्हणजे त्या घटनांमध्ये पत्रकारांचा हात असतो? ऑन दी स्पॉट रिपोर्टींगचा अर्थ काय? पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करून माध्यमांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न असल्याने गोविंद वाकडे यांच्या अटकेचा आणि सरकारी दमण नीतीचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, मराठी पत्रकार परिषद निषेध करीत आहे..
शाईफेक प्रकरणाची चौकशी व्हावी आमचा विरोध नाही मात्र आपलं काम करणार्या माध्यमांना नाहक त्रास देऊ नये ते आम्ही खपवून घेणार नाही..