पिंपरी, दि.१३ ऑक्टोबर २०२२ :-  सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी दुपारी ३ ते ६ अशी वेळ अभ्यागत आणि नागरिकांना भेटीकरीता आयुक्त शेखर सिंह यांनी निश्चित केली आहे. याबाबत स्वतंत्र आदेश प्रशासनाने निर्गमित केला आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेशी संबंधित कामकाजाकरीता महापालिका आयुक्तांकडे दररोज अभ्यागत आणि नागरिक भेटीकरीता महापलिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनात समक्ष  येत असतात. परंतु महापालिकेसंबंधी कामकाजाची व्याप्ती, विविध प्रसंगानुरूप महापालिकेचे संबंधित अधिकारी तसेच पदाधिकारी यांच्यासोबत बैठकांचे आयोजन,  अत्यावश्यक कामकाज, अशा सर्व बाबी आयुक्तांकडे चालू असतात. परिणामी कामकाजा निमित्त भेटीसाठी आलेल्या अभ्यागत आणि नागरिकांना आयुक्त यांच्याशी भेटणे शक्य होत नाही.  या बाबींचा विचार करून अभ्यागत आणि नागरिकांना भेटण्याची वेळ यापूर्वी निश्चित करण्यात आली होती. आता या वेळांमध्ये बदल करण्यात आला असून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी दुपारी ३ ते ६ ही वेळ भेटीसाठी निश्चित करण्यात आली आहे. या वेळेत अभ्यागत आणि नागरिकांना महापालिका आयुक्त आयुक्त शेखर सिंह यांना  कामकाजानिमित्त समक्ष भेटता येणार आहे.

मात्र काही प्रसंगी महापालिका आयुक्त  अन्य शासकीय कार्यालय, मंत्रालय, मुंबई अथवा महापालिकेच्या मासिक सभा, स्थायी समिती सभा, विधी समिती सभा याकरीता सभागृहामध्ये उपस्थित असतात. त्यामुळे अशा प्रसंगी ते नागरिकांना भेटण्यास उपलब्ध होऊ शकणार नाहीत, याची नोंद देखील नागरिकांनी घ्यावी,  असेही  आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *