पिंपरी (दिनांक:१७ सप्टेंबर २०२२):- “कवितालेखन हा कवीचा आत्मशोध असतो!” असे विचार ज्येष्ठ कवयित्री आश्लेषा महाजन यांनी कॅप्टन कदम सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार, दिनांक १६ सप्टेंबर २०२२ रोजी व्यक्त केले. नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळ आयोजित आणि कवयित्री माधुरी विधाटे लिखित ‘मल्हारधून’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना आश्लेषा महाजन बोलत होत्या. ज्येष्ठ बालसाहित्यिका रजनी अहेरराव, नवयुगच्या सहसचिव अश्विनी कुलकर्णी, बाएफच्या वित्त व्यवस्थापिका शोभा कोकाटे, प्रकाशिका नीता हिरवे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती; तसेच ह.भ.प. किसनमहाराज चौधरी, राजेंद्र घावटे, ॲड. रूपाली भोजने, राजन लाखे यांच्यासह शहरातील साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची सभागृहात उपस्थिती होती.

रजनी अहेरराव यांनी आपल्या मनोगतातून, “पक्षी पिंजऱ्यातून उडण्याची क्रिया म्हणजे कवितेचे आविष्करण होय. परिपक्वता ते उत्कट भक्ती यांचे दर्शन घडविणाऱ्या अन् उत्स्फूर्त भावभावनांनी ओथंबलेल्या कविता ‘मल्हारधून’मध्ये वाचायला मिळतात. मुखपृष्ठावरील कलात्मकता आणि मलपृष्ठावरील प्रा. तुकाराम पाटील यांची विद्वत्ता रसिकांना खिळवून ठेवते!” असे गौरवोद्गार काढले. कवयित्री माधुरी विधाटे यांनी, “शालेय जीवनातील कवितालेखन स्पर्धेतून लेखनाचा प्रारंभ झाला. साहित्याच्या वाटचालीत शिक्षकांच्या संस्कारांची कधीही न संपणारी शिदोरी माझ्या सोबत आहे. कौटुंबिक सौख्य अन् साहित्यिक परिवाराच्या सान्निध्यात स्वान्तसुखाय असलेले माझे लेखन समृद्ध होत गेले!” अशा कृतज्ञ भावना व्यक्त केल्या. प्रकाशनापूर्वी, उज्ज्वला केळकर (ज्ञानेश्वरी), सविता इंगळे (गुज नवे), वर्षा बालगोपाल (वारी), हेमांगी जाधव (पिता), सुप्रिया लिमये (विश्वप्रार्थना) यांनी ‘मल्हारधून’ या कवितासंग्रहातील कवितांचे अभिवाचन केले. आश्लेषा महाजन पुढे म्हणाल्या की, “मनातील अंधाराच्या कल्लोळाला उजेडाची वाट दाखविण्यासाठी कविता हे खूप प्रभावी माध्यम आहे. जे स्वसंवेद्य असते ते अमूर्ताला मूर्तरूप देते, असे ज्ञानेश्वरमाउलींनी म्हटले आहे. माधुरी विधाटे यांच्या कवितेतून सोज्ज्वळतेचा एक शांत प्रवाह अनुभवायला मिळतो. कालबाह्य होत असलेले नादमयी काव्यप्रकार ‘मल्हारधून’मध्ये आढळतात, हा आजच्या गतिमान जीवनातील आनंदाचा ठेवा आहे!”

ज्ञानेश्वरी जयंतीनिमित्त ‘ज्ञानेश्वरी’पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. अश्विनी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. डॉ. शिवाजी विधाटे, डॉ. प्रीतेश विधाटे, जगन्नाथ लडकत, राज अहेरराव, नंदकुमार मुरडे, रमेश वाकनीस, पी. बी. शिंदे, संपत शिंदे, अनिकेत गुहे यांच्यासह नवयुग साहित्य व शैक्षणिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजनात सहकार्य केले. माधुरी ओक यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अनुजा गडगे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *