पिंपरी (दिनांक : ०१ ऑगस्ट २०२२) “अध्यात्माच्या वाटेने गेल्यास परमेश्वरप्राप्ती निश्चित होते; अर्थातच आपले विहित कर्म करणे म्हणजेच अध्यात्म होय!” असे मत सुप्रसिद्ध कवी अनिल दीक्षित यांनी ज्येष्ठ नागरिक संघ, पिंपरीगाव येथे रविवार, दिनांक ३१ जुलै २०२२ रोजी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले. काही दिवसांपूर्वीच आषाढी वारी संपन्न झाली, या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ साहित्यिक सुरेश कंक लिखित ‘विठ्या’ या भक्तिमय कथेचे अभिवाचन ज्येष्ठ रंगकर्मी नंदकुमार मुरडे (नामदेव), कवयित्री वर्षा बालगोपाल (सावित्री) आणि चौदा वर्षे वयाचा विद्यार्थी आत्रेय गांधलीकर (विठ्या) यांनी अतिशय उत्कटतेने केले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पी. एस. आगरवाल आणि राधाबाई वाघमारे यांनी केलेल्या विठ्ठल-रखुमाईंच्या प्रतिमापूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. साहित्यिक सुरेश कंक, शोभा जोशी, प्रदीप गांधलीकर, रघुनाथ पाटील, अशोक गोरे, कैलास भैरट, तानाजी एकोंडे, निशिकांत गुमास्ते, शामराव सरकाळे, नीलेश शेंबेकर, मयूरेश देशपांडे, संगीता सलवाजी आणि पिंपरीगाव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दत्तोबा नाणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अप्रतिम वाचिक अभिनयातून ‘विठ्या’ या कथेतील भक्तिरसाचा परिपोष करीत अभिवाचनात सहभागी झालेल्या कलावंतत्रयीने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. अनिल दीक्षित पुढे म्हणाले की, “या कथा अभिवाचनाच्या माध्यमातून तीन पिढ्यांचा सुरेख संगम अनुभवता आला. ‘विठ्या’ या कथेतील नायक हा शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा आहे; त्याचप्रमाणे तो निष्ठावान वारकरीदेखील आहे. त्यामुळेच त्याला प्रत्यक्ष विठ्ठल भेटायला येतो!” तुकाराम इंगळे, सुरेश पवार, मोहन कांबळे, शिवाजी इंगळे, संध्या गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. शांताराम सातव यांनी सूत्रसंचालन केले. सुरेश शिंदे यांनी आभार मानले. सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *