‘पीसीएमसी सिव्हिक इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह २०२२’ उपक्रमांतर्गंत २३ नव कल्पनांचे सादरीकरण

पिंपरी, ३० जुलै २०२२ : समाज व शहरी जिवनास फायदेशीर अशा नवकल्पनांचा वापर वाढवून समाज जीवन सुकर करण्यासाठी तसेच महापालिकाद्वारे विकास प्रकल्पांची गती वाढविण्याकरिता त्यांना नव स्टार्टअपची जोड देवून प्रोत्साहीत करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी दिली. नागरी उपाय/ उत्पादने अंमलात आणून समस्यांवर सहज तोडगा काढण्यासाठी स्टार्टअप इंडियाच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका व स्मार्ट सिटीच्या वतीने स्टार्टअप्सला संधी म्हणून ‘पीसीएमसी सिव्हिक इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह २०२२’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये, २३ स्टार्टअपनी सहभागी होवून आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्यासमोर समाधान / नवकल्पनांचे सादरीकरण केले. ऑटो क्लस्टर येथे हा उपक्रम पार पडला.

यावेळी, आयुक्त यांच्यासह पॅनेलिस्ट म्हणून अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शहर अभियंता मकरंद निकम, स्मार्ट सिटीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपायुक्त अजय चारठणकर, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, सह शहर अभियंता प्रमोद ओंबासे, सीटीओचे अनुप फणसे, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, स्मार्ट सारथी टीमचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे नव स्टार्टअपना संधी देण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला देशभरातून ७८ स्टार्टअपनी प्रतिसाद देत नोंदणी करून सहभाग घेतला. यामधून शहरासाठी आवश्यक असलेल्या २३ स्टार्टअपला आपल्या कल्पना मांडण्याची संधी देण्यात आली. यामध्ये, ड्रेनेज, सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट, आरोग्य व वैद्यकीय, पर्यावरण व स्वच्छता, रस्ते, बांधकाम क्षेत्र, आयओटी विभाग, पार्किंग संबंधित असलेल्या स्टार्टअपनी समस्यांवरील उपाय मांडले. यातून शहरासाठी उपयुक्त्‍ अशा स्टार्टअपला प्रायोगिक तत्वावर संधी देण्यात येणार आहे.

स्टार्टअप्सना नवकल्पना आणि डिझाईन द्वारे विकसित होण्यासाठी स्टार्टअप इंडिया च्या धर्तीवर शहरी समस्यांचे निवारण करणा-या स्टार्टअपला प्रोत्साहन मिळावे, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने पुढाकार घेतला आहे. डिजिटल/तंत्रज्ञान क्षेत्रापासून ते सामाजिक क्षेत्र, आरोग्यसेवा, शिक्षण आदी क्षेत्रातील नवकल्पना आणि स्टार्टअप्सची इकोसिस्टम तयार करणे आणि नोकरी शोधणार्‍या ऐवजी नोकरी निर्मात्यांच्या देशात भारत परिवर्तित होण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या माध्यमातून ‘पीसीएमसी सिव्हिक इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह २०२२’ उपक्रम घेण्यात आल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी यावेळी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *