पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत शाळांची मुजोरी वाढली; काळेवाडीतील माने इंग्लिश मीडियम शाळेने तपासणीसाठी गेलेल्या अधिकाऱ्याला प्रवेशद्वाराच्या आत येऊच दिले नाही…
पिंपरी, दि. ६ (प्रतिनधी) – पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृतपणे चालणाऱ्या शाळांचा मुजोरपणा एवढा वाढला आहे की, शाळा व्यवस्थापन वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जुमानत नसल्याचे समोर आले आहे. काळेवाडी येथील माने इंग्लिश मीडियम स्कूल या अनधिकृत शाळेची पाहणी आणि कागदपत्रांच्या तपासणीसाठी गेलेले महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे व त्यांच्या सहकाऱ्यांना बुधवारी (दि.६) शाळेच्या आतमध्ये प्रवेशच दिला गेला नाही. त्यांना शाळेच्या प्रवेशद्वारावरच अडवून ठेवण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे या शाळेच्या तपासणीसाठी यापूर्वी गेलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शाळा व्यवस्थापनाकडून धक्काबुक्कीही करण्यात आल्याचे संजय नाईकडे यांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाने या शाळेच्या विरोधात फौजदारी कारवाईची बडगा उगारण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबतचा अहवाल शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठवण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत अनेक शाळा अनधिकृतपणे चालवल्या जातात. शहरातील अशा अनधिकृत शाळांची यादी महापालिकेच्या शिक्षण विभागाने जाहीर केलेली आहे. तसेच या शाळांमध्ये कोणत्याही विद्यार्थ्याने प्रवेश घेऊ नये. पालकांनीही आपल्या पाल्याला अधिकृत शाळेतच प्रवेश घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी यापूर्वी केले आहे. त्याचबरोबर त्यांनी स्वतः शहरातील अनधिकृत शाळांची तपासणी करून त्या बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ते प्रत्येक अनधिकृत शाळेत जाऊन तेथे माहिती घेऊन तपासणी करत आहेत.
त्यानुसार प्रशासन अधिकारी संजय नाईकडे व त्यांचे सहकारी बुधवारी (दि.६) काळेवाडी येथील माने इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गेले होते. मात्र शाळा व्यवस्थापनाने त्या सर्वांना प्रवेशद्वारावरच अडवले. प्रशासन अधिकारी संजय नाईकडे व त्यांचे सहकारी कायदेशीर बाबी सांगून शाळेत प्रवेश देण्याची विनंती शाळा व्यवस्थापनाला करत होते. आम्हाला शाळेची तपासणी करू द्या व तुमच्याकडे कागदपत्रे असतील तर दाखवा, अशी विनंती त्यांनी शाळा व्यवस्थापनाकडे केली. पण शाळा व्यवस्थापनाने त्यांना आतमध्ये प्रवेशच दिला नाही. त्यामुळे या अनधिकृत शाळेच्या व्यवस्थापनाचा मुजोरपणा आणि दादागिरी किती वाढला आहे, हे स्पष्ट होते.
यासंदर्भात महापालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी संजय नाईकडे म्हणाले, “काळेवाडीमध्ये माने इंग्लिश मीडियम ही इंग्रजी माध्यमाची शाळा चालवली जाते. ही शाळा अनधिकृत आहे. ही अनधिकृत शाळा बंद करावी म्हणून व्यवस्थापनाला अनेकदा सूचित करण्यात आले आहे. आमच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शाळेला वारंवार भेटी दिल्या आहेत. पण शाळा व्यवस्थापन त्यांना प्रवेशद्वाराच्या आत घेतच नाही. शाळा भेटीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना कोणताही प्रतिसाद दिला जात नाही. कोणतीही उत्तरे देत नाहीत. आज शिक्षण उपसंचालक कार्यालयातील काही क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी या शाळेला तपासणीसाठी भेट दिली. त्यांना तेथे धक्काबुक्की करण्यात आली. शेवटी मी स्वतः माझ्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत या शाळेला भेट दिली. शाळेची माहिती किंवा अधिकृत कागदपत्रे सादर करण्यास मी सांगितली. पण शाळा व्यवस्थापनाने आम्हाला शाळेच्या आतमध्ये प्रवेशच दिला नाही. प्रवेशद्वारावरच ताटकळत ठेवले. अनधिकृतपणे शाळा सुरू ठेवणे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना दुर्लक्षित करणे, त्यांना कोणत्याही प्रकारची कार्यालयीन व प्रशासकीय माहिती न देणे तसेच एक प्रकारे प्रशासकीय कामात अडथळा आणण्याचे काम शाळा व्यवस्थापन करत आहे. ही अनधिकृत शाळा असून, पालकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. या शाळेने तत्काळ शाळा बंद करावी. अन्यथा शाळेविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणे किंवा शासन नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्याबाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.”
