पिंपरी (दिनांक : १४ जून २०२२) निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला आणि निसर्गमित्र विभागाच्या वतीने घोरावडेश्वर डोंगरावर वडाचे रोपण करून मंगळवार, दिनांक १४ जून २०२२ रोजी वटसावित्री व्रत साजरे करण्यात आले. या प्रसंगी निसर्गमित्र विभागाने आठ वर्षांपूर्वी लावलेल्या वटवृक्षाचे रुचिका चैतन्य आणि ऋतुजा संत या नवविवाहित महिलांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. शारदा रिकामे यांनी पूजेचे पौरोहित्य केले; तर महिला विभागअध्यक्ष प्रा. शैलजा सांगळे यांनी सुमारे वीस महिला आणि उपस्थित निसर्गप्रेमी कार्यकर्त्यांच्या समवेत हरित प्रतिज्ञेचे सामुदायिक वाचन केले. निसर्गमित्र विभागाचे ज्येष्ठ सदस्य विजय सातपुते यांनी माहिती देताना सांगितले की, तेरा वर्षांपासून ते आजतागायत निसर्गमित्र विभागाने घोरावडेश्वर डोंगरावरील अंदाजे दहा एकर क्षेत्रावर सुमारे पंधरा हजार वृक्षांचे रोपण केले आहे. खडकाळ जमीन, वणव्यामुळे लागणाऱ्या आगी आणि काही उपद्रवी व्यक्तींचा उपसर्ग या समस्यांवर मात करीत त्यापैकी बारा हजार वृक्षांचे संवर्धन करण्यात यश मिळाले आहे. कांचन, रिठा, धावडा, महाधावडा, वड, पिंपळ, चिंच, आवळा, पेरू, जांभूळ, साल, बिजा, सीताअशोक अशा देशी वृक्षांमुळे पूर्वीचा रखरखीतपणा कमी होऊन पक्ष्यांचा अधिवास वाढला आहे. डोंगरावरील पाच नैसर्गिक टाक्यांमधील गाळ काढून तसेच एक ते पाच हजार लीटर क्षमतेच्या सात पाण्याच्या टाक्या बसवून आणि एक इंच व्यासाच्या नळजोडणीमुळे वर्षभर पुरेल इतपत पाण्याची तजवीज करण्यात आली आहे. मंडळाचे सरासरी पंचेचाळीस कार्यकर्ते नियमितपणे वृक्षसंवर्धनासाठी वेळ देतात. पर्यावरणदिन, वटपौर्णिमा, विजयादशमीचे शमीपूजन असे औचित्य साधून डोंगरावर स्नेहमेळाव्यांचे आयोजन केले जाते. त्यावेळी वृक्षारोपण, पर्यावरण जागृती याविषयी प्रबोधन करण्यात येते. त्यामुळे शाळा, कंपन्या, स्वयंसेवी संस्था आणि निसर्गप्रेमी नागरिक सहकुटुंब या ठिकाणी आवर्जून भेट देतात. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे माजी अध्यक्ष विनोद बन्सल, भास्कर रिकामे, दीपक नलावडे, रवींद्र मंकर, विनीत दाते यांनी संयोजनात परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *