पिंपरी (दि.२९ एप्रिल २०२२):- राज्याच्या अन्नधान्य पुरवठा विभागाने रेशन दुकानांना आयएसओ मानांकन देण्यासाठीचा निर्णय घेतला आणि आज तो प्रत्यक्षातही येत आहे. राज्यातील रेशन दुकानदारांनी स्वयंप्रेरणेतून स्वतःच्या दुकानात ग्राहकांना उत्तम दर्जाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. त्या अनुषंगाने आवश्यक त्या सुधारणा कराव्यात. अधिकाऱ्यांनी ग्राहक आणि दुकानदार यांच्यातील दुवा बनून काम करावे. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत रसद विनातक्रार पोहोचवावी. आता हा नवा बदल अंगीकारा. राज्य सरकार सर्व ते सहकार्य करील, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
रेशन दुकानांना आयएसओ मानांकन मिळावे, रेशन दुकानदारांकडे पाहण्याचा ग्राहकांचा दृष्टिकोन बदलावा, यासाठी पुरवठा विभागाचे उपायुक्त डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यात योजना राबविण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवार (दि. २९) रोजी राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी रामटेक बंगल्यावर भुजबळांच्या शुभहस्ते तसेच अन्न व नागरीक संरक्षण विभाग मंत्रालयाचे प्रधान सचिव विजय वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत रेशन दुकानदारांना आयएसओ प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. त्यावेळी भुजबळ बोलत होते.
यावेळी पुणे पुरवठा विभागाचे उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी, पुणे विभागातील सर्व DSO, FDO, तहसिलदार, ना. तहसिलदार, अधिकारी वर्ग, ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शाॅप किपर्स फेडरेशनचे सर्व जिल्हाध्यक्ष, राष्ट्रीय व राज्य खजिनदार विजय गुप्ता, अ झोन अध्यक्ष अभिजित सड्डो, ब झोन अध्यक्ष बसवराज बिराजदार उपस्थित होते. दरम्यान सोलापुर जिल्ह्यातील पहिले आयएसओ प्रमाणपत्र संघटनेचे जिल्हाप्रमुख नितीन पेंटर यांना देण्यात आले. तसेच पिंपरी चिंचवड शहरातून विजय गुप्ता यांनाही आयएसओ प्रमाणपत्र बहाल करण्यात आले.
उपायुक्त त्रिगुण कुलकर्णी म्हणाले, पुणे विभागात पुरवठा विभागा अंतर्गत पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूर येथील रेशन दुकानदारांना आयएसओ प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येत आहे. यात उप आयुक्त (पुरवठा) पुणे यांचे कार्यालय, ५ जिल्हा पुरवठा कार्यालये, २ अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालये, ६० तहसिल कार्यालये, १५ परिमंडळ कार्यालये व ८० गोदामे असून या सर्व १६३ कार्यालये व गोदामांना आय. एस. ओ ९००१-२०१५, आय. एस. ओ. २८०००-२००७ हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. तसेच ९१६४ रास्तभाव दुकानांपैकी ७९३१ रास्तभाव दुकानांना आय. एस. ओ. ९००१- २०१५ हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे. म्हणजेच सर्व कार्यालये व रास्तभाव दुकान यांना एकूण ८०९४ प्रमाणपत्र देण्यात येत आहेत. रेशन दुकानांमध्ये स्वच्छता, ग्राहकांना चांगल्या दर्जाचे धान्य, आकर्षक मांडणी, वेळेवर धान्य वितरण, कोणत्या योजनेंतर्गत किती धान्य प्राप्त झाले याची माहिती रेशन दुकानांमध्ये फलकावर उपलब्ध होणार आहे.
ऑल महाराष्ट्र फेअर प्राईज शाॅप किपर्स फेडरेशनचे खजिनदार विजय गुप्ता म्हणाले, सरकारच्या निर्णयाने रेशन दुकानचालकांचा सन्मान वाढणार आहे. नागरिकांचा रेशन दुकानांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. त्या अनुषंगाने सर्व रेशन दुकानदार प्रयत्नशील आहेत. राज्य सरकारने रेशन दुकानदारांच्या उत्पन्न वाढीबाबतही सकारात्मक विचार करावा. आयएसओ प्रमाणपत्र वाटपाबद्दल सरकारचे आभार.