पिंपरी (दि. 20):- महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन प्रचंड गाजावाजा करत अर्धवट मेट्रोचे उद्घाटन करुन भारतीय जनता पक्ष पुन्हा तोंडघशी पडला आहे. अवघ्या महिन्याभरातच मेट्रोची प्रवासी संख्या तब्बल 90 टक्क्यांनी घटल्यामुळे मेट्रो तोट्यात जाऊ लागली आहे. पिंपरीसह अनेक मेट्रो स्टेशन्सची कामे अर्धवट असतानाही महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ श्रेय लाटण्याच्या धडपडीत सर्वसामान्यांच्या त्रासात आणखीनच भर घालण्याचे काम भाजपाने केले आहे. सर्वसामान्य जनतेच्या पैशांमधूनच मेट्रोचा तोटा भरून काढावा लागणार असल्याने जनतेवर बोजा लादण्याचे पाप करणारे भारतीय जनता पक्षाचे नेते मेट्रोच्या अपयशाचे श्रेय घेतील का? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी उपस्थित केला.
मेट्रोबाबत अजित गव्हाणे यांनी एक प्रसिद्धीपत्रक काढले असून मेट्रोच्या कामात नाहक श्रेय घेण्याच्या भाजपाच्या लबाडीवर त्यांनी हल्लाबोल केला आहे. त्यांनी या पत्रकात म्हटले आहे  की, मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकार व राज्यसरकारची 50 टक्क्यांची भागीदारी आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेट्रोसाठी तब्बल 5 हजार कोटींहून अधिक निधी जानेवारी 2020 मध्ये दिला. त्यानंतरच या कामाला गती मिळाली. राज्य शासनाने व विशेषत: अजित पवार यांनी अर्थमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून आपली जबाबदारी पार पाडली मात्र त्याचा ‘इव्हेंट’ कधीच केला नाही.
मेट्रोची सर्व कामे पूर्ण होऊन हा प्रकल्प लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा, या हेतूने मविआ सरकारकडून सर्वप्रकारची मदत करण्यात आली आहे. मेट्रो ही खरंतर प्रवाशांच्या सुविधेसाठी आहे. लोकांचा वेळ आणि पैसा वाचावा तसेच त्यांचा प्रवास सुखकर आणि वेगवान व्हावा यासाठी हा मेट्रो प्रकल्प असताना केवळ महापालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केंद्रात सरकार असल्याच्या बळावर भाजपच्या नेत्यांनी कामे अर्धवट असतानाही मेट्रोच्या उद्घाटनाची घाई केली. या घाईचे परिणाम आता दिसू लागले आहेत. अवघ्या महिनाभराच्या कालावधीतच मेट्रोच्या प्रवाशी संख्येमध्ये तब्बल 90 टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे भाजपने केलेल्या अतिघाईमुळे सामान्य लोकांबरोबरच मेट्रो प्रकल्पालाही संकटात घातल्याचा आरोप गव्हाणे यांनी केला.
भाजपच्या या स्टंटबाजीचा प्रसिद्धी पत्रकात खरपूस समाचार घेताना अजित गव्हाणे पुढे म्हणाले की, केवळ दिखाव्यासाठी आणि फुकटच्या स्टंटबाजीसाठी गल्ली ते दिल्ली इव्हेंटमध्ये व्यग्र असणार्‍या भाजप नेत्यांना सर्वसामान्य लोकांच्या त्रासाशी काहीही देणे-घेणे नसल्याचेच पुणे व पिंपरी-चिंचवडच्या अर्धवट मेट्रो सेवेवरून लक्षात येते. 13 मार्चला 67 हजारांपर्यंत गेलेला प्रवाशांचा आकडा एक महिन्यानंतर अवघा 5 हजारांवर आला आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर मेट्रो सेवा तात्पुरती बंद करावी लागण्याची शक्यता नाकारता येणार नाही. पाच हजार प्रवाशांमधील पिंपरी चिंचवडमधील प्रवासी केवळ संख्या 1 हजार 417 इतकी आहे. महिनाभरातील मेट्रोचे 80 लाखांचे उत्पन्न खर्चाच्या तुलनेत अत्यल्प आहे. उद्घाटनावेळी गाजावाजा केलेल्या इ-रिक्षा, इ-बाइक आणि सायकलीचा नुसता फार्सच ठरला. सध्या केवळ दोन स्थानकांबाहेरच बाइक आणि सायकली दिसत आहेत. मात्र, त्या कार्यान्वित नसल्याचे दिसून येते. उद्घाटनाच्या दिवसापासून या बाइक आणि सायकली धुळखात पडल्या आहेत. मेट्रो सुरू झाल्यानंतरदेखील वनाझ ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी ते फुगेवाडी यादरम्यान स्थानकांची कामे अपूर्णच आहेत. साधे जिने, सरकते जिने, आणि लिफ्टची कामे, रंगरंगोटी, डागडुजी आदी संदर्भातील स्टेशन्सची कामे अर्धवट असल्याने प्रवाशांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
जनतेने विचार करण्याची गरज…
तर खर्चाच्या तुलनेत उत्पन्न अल्प असल्याने निर्माण होणार्‍या तोट्याचा भारही सर्वसामान्य जनतेवर पडणार आहे. श्रेयवादासाठी सुरू केलेल्या अर्धवट मेट्रोबाबत सर्वसामान्य लोकांचे आकर्षण संपले आहे. कामासाठी प्रवास करणार्‍या नागरिकांचे मात्र हाल सुरू आहेत. न केलेल्या कामांचे श्रेय घेण्यात तरबेज असणार्‍या भारतीय जनता पक्षाच्या इव्हेंट बहाद्दर नेत्यांनी अर्धवट मेट्रो सुरू करून सर्वसामान्य लोकांच्या डोक्यावर बोजा घालण्याचेच काम केले आहे. या नेत्यांना लोकांची खरोखरच काळजी आहे का? की केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांच्याकडून असे स्टंट केले जातात, याचा सर्वसामान्य जनतेनेच विचार केला पाहिजे, अशी अपेक्षा अजित गव्हाणे यांनी पत्रकात व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *