पिंपरी (दि.२९ मार्च २०२२):- वास्तुविशारद क्षेत्रातील शिक्षण आणि व्यवसाय यांच्यातील अंतर कमी केल्यास या क्षेत्रातील नवनवीन संशोधन आणि तंत्रज्ञानाचा उपयोग पुढील कालावधीत लवकर करुन घेता येईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात आवश्यक ते बदल करावे लागतील. सर्वसामान्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य आणि जीवनमान उंचावण्यासाठी वास्तूविशारद महत्वाची भुमिका बजावतात. या क्षेत्रात तरुणींना देखील अनेक संधी उपलब्ध आहेत असे प्रतिपादन भारतीय कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरचे अध्यक्ष ए. आर. हबीब खान यांनी केले.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) एस. बी. पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईन (एसबीपीसीओएडी) येथे विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आर्ट गॅलरीचे उद्‌घाटन प्रसंगी ए. आर. हबीब खान बोलत होते. यावेळी शिकागो येथील शहर नियोजन आणि धोरण समितीचे संचालक डॉ. संजीव विद्यार्थी, शिकागो येथील शहर नियोजन आणि धोरण समितीचे विभाग प्रमुख डॉ. निक थेओडोर, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर ट्रेनिंग ॲण्ड रिसर्च सेंटरच्या समन्वयक प्रा. जयश्री देशपांडे, एसबीपीसीओएडीचे प्राचार्य डॉ. महेंद्र सोनवणे, समन्वयक प्रा. शिल्पा पाटील, ज्येष्ठ वास्तुविशारद प्रशांत देशमुख, महेश नागपूरकर, पुष्कर कालविंदे, डॉ. वसुधा गोखले आदी उपस्थित होते.

यावेळी हबीब खान म्हणाले की, भारतामध्ये एक लाख आठ हजार नोंदणीकृत वास्तूविशारद आहेत. यामध्ये ५४ टक्के महिला आहेत. त्यापैकी ३४ टक्क्यांहून जास्त वास्तुविशारद महिला उद्योग, व्यवसायात कार्यरत नाहीत हे कुशल मनुष्यबळ देखील कार्यरत झाले पाहिजे. देशातील उपलब्ध संसाधनांचे जतन करुन हवामान बदलाबाबत माहिती घेऊन कमी खर्चात उत्कृष्ट आणि दिर्घकाळ फायदेशीर ठरतील अशा वास्तू उभारुन नागरिकांचे जीवन अधिक सुखकर होण्यासाठी वास्तूविशारदांनी योगदान द्यावे असेही हबीब खान म्हणाले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. संजीव विद्यार्थी, डॉ. निक थेओडोर, डॉ. महेंद्र सोनवणे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

स्वागत शिल्पा पाटील, सुत्रसंचालन प्रियांका लोखंडे आणि आभार ऋतूजा माने यांनी मानले.
————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *