पिंपरी :- “कष्टकऱ्यांचे चित्र अस्वस्थ करते; परंतु कष्टकऱ्यांचे चरित्र समाज घडवते. आपल्या देशात असंघटित कष्टकऱ्यांची समांतर संस्कृती आहे. त्यांचे मोठ्या प्रमाणावर शोषण होते; परंतु समाज संवेदनाहीन आहे आणि सरकार मुर्दाड आहे. श्रमाला जात, धर्म नसतो म्हणून सर्व महापुरुषांच्या विचारांची बेरीज करून नवी मानवतावादी श्रमसंस्कृती निर्माण झाली पाहिजे!” असे विचार ज्येष्ठ साहित्यिक आणि समीक्षक प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस यांनी श्रमशक्ती भवन, बजाज ऑटोसमोर, आकुर्डी येथे शनिवार, दिनांक २६ मार्च २०२२ रोजी व्यक्त केले.
कष्टकरी संघर्ष महासंघ, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय पद्मश्री नारायण सुर्वे कष्टकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून प्रा.डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी अध्यक्ष सुदाम भोरे यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. ज्येष्ठ उद्योजक रंगनाथ गोडगे-पाटील स्वागताध्यक्ष होते; तर ज्येष्ठ कामगारनेते शिवाजीराव खटकाळे, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरी शाखाध्यक्ष मुरलीधर साठे, माजी संमेलनाध्यक्ष तुकाराम धांडे, बांधकाम मजूर अर्चना कांबळे, नारायण सुर्वे यांच्या कन्या कल्पना घारे आणि जावई गणेश घारे, मुख्य संयोजक काशिनाथ नखाते यांची प्रमुख उपस्थिती होती. आकुर्डी चौक ते संमेलनस्थळापर्यंत कष्टकऱ्यांच्या अभिवादन दिंडीने संमेलनाचा प्रारंभ करण्यात आला. अभिवादन दिंडीमध्ये कष्टकरी कुदळ, फावडे, टोपली, सायकल, झाडू, हेल्मेट या सुरक्षा साधनांसह सहभागी झाले होते. त्याप्रसंगी कष्टकरी कामगारांनी घोषणा देत आपल्या मागण्या मांडल्या. महिलांची लक्षणीय उपस्थिती असलेल्या या संमेलनाचे उद्घाटन कष्टकऱ्यांच्या अवजारांचे पूजन करून करण्यात आले. “आता उठवू सारे रान…” या सानेगुरुजींच्या कवितेचे प्राची देशमाने यांनी प्रभावी सादरीकरण करून स्वागत केले. काशिनाथ नखाते यांनी आपल्या प्रास्ताविकातून, “दिल्लीच्या रामलीला मैदानावर केलेल्या संघर्षमय मागणीमुळे फेरीवाला यांच्यासाठी कायदा अस्तित्वात आला; परंतु अजूनही असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा नाही. भारतीय राज्यघटनेच्या तरतुदींचा आधार घेऊन यासाठी कायदा निर्माण केला पाहिजे. लॉकडाउनच्या काळात केंद्र सरकार असंघटित कामगारांच्या पाठीशी उभे राहिले नाही; परंतु संघटनेने सुमारे अडीच लाख कामगारांना जेवण देण्याची व्यवस्था केली. श्रमाच्या अन् घामाच्या समन्वयातून होत असलेल्या या संमेलनात माणसाला माणुसकी बहाल करणारा असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा कायदा अस्तित्वात यावा हीच मागणी आहे. कामगारांचा संघटनेवरील विश्वास आणि एकजुटीतून आपण आपले हक्क प्राप्त करू शकतो!” अशी भूमिका मांडली.
या प्रसंगी ‘चार घास सुखाचे’ या ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून कष्टकरी संघर्ष महासंघाच्या कष्टकऱ्यांना दररोज सुमारे तीन हजार जेवणाचे डबे पुरविणाऱ्या उपक्रमाची माहिती देण्यात आली. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात ज्येष्ठ चित्रपटनिर्माते, विडंबनकार रामदास फुटाणे यांची कवी भरत दौंडकर यांनी ‘आयुष्याची वाट तुडवतांना…’ या कार्यक्रमांतर्गत मुलाखत घेतली. फुटाणे यांनी किस्से, कविता, वात्रटिका उद्धृत करीत आपल्या गतजीवनातील आठवणींना उजाळा देताना श्रोत्यांशी मनमोकळा संवाद साधला. तिसऱ्या सत्रात कविवर्य उद्धव कानडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ‘घामाचे गाव’ या निमंत्रितांच्या कविसंमेलनात पीतांबर लोहार, रवी पाईक, दत्तात्रय जगताप, सुहास घुमरे, सुमीत गुणवंत, अरुण कांबळे, जित्या जाली, रवी कांबळे, हृदयमानव अशोक, मधुश्री ओव्हाळ यांनी सहभाग घेतला. संगीता झिंजुरके यांनी कविसंमेलनाचे सूत्रसंचालन केले. संमेलनात डॉ. सुरेश बेरी यांना श्रमप्रतिष्ठा पुरस्कार आणि अकराशे वेळा डायलिसीसला सामोरे जाणारे कविवर्य माधव पवार यांना केशवसुत श्रमप्रतिष्ठा पुरस्कार प्रदान करण्यात आले; तसेच वासुदेव काळसेकर यांना करोना काळात गरजूंना भोजन पुरविल्याबद्दल आणि राजेंद्र वाघ यांना कामगारभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. अलका पडवळ (घरेलू कामगार), तुकाराम माने (हातगाडी धारक), सद्दाम आलम (बांधकाम मजूर) आणि गुरू बडदाळे (रिक्षा चालक) या कष्टकरी असंघटित कामगारांचा जीवनप्रवास मुलाखतींच्या माध्यमातून जाणून घेत त्यांना गौरविण्यात आले. याशिवाय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करणाऱ्या समाजातील विविध व्यक्ती आणि संस्था यांना कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने धनादेश प्रदान करून आर्थिक पाठबळ देण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘कष्टकऱ्यांच्या जीवनात नवी पहाट केव्हा उगवेल?’ या चर्चासत्रात वरिष्ठ महाव्यवस्थापक सूर्यकांत मुळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे आणि मारुती भापकर, कामगारनेते किशोर ढोकले, ज्येष्ठ पत्रकार जयंत जाधव, नंदकुमार सातुर्डेकर, क्रांतिकुमार कडुलकर यांनी असंघटित कामगारांची दुरवस्था, सरकारी यंत्रणांमधील गैरव्यवहार, राजकीय आणि कामगार नेतृत्वाची दुर्लक्षित वृत्ती, माध्यमांचे व्यावसायिकीकरण यांविषयी परखड मते व्यक्त केलीत. अविनाश चिलेकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “रक्तरंजित क्रांतीशिवाय कष्टकऱ्यांच्या जीवनात नवी पहाट उगवण्याची शक्यता नाही. अथवा राजकीयदृष्ट्या प्रगल्भ झालेले असंघटित कामगार आणि सच्चे कामगारनेते यांच्या समन्वयातूनच कामगारांचे जीवन समृद्ध होण्याची आशा आहे!” असे मत व्यक्त केले. श्रीकांत चौगुले यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले. संयोजनात महाराष्ट्र कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, युवराज निलवर्ण, राजेश माने, सलीम डांगे, महादेव गायकवाड, सुरेश देडे, सुशांत खरात, यासीन शेख, संभाजी वाघमारे, मधुकर वाघ, अंबालाल सुकवाल, किरण साडेकर, चंद्रकांत कुंभार यांनी परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन केले. मुख्य समन्वयक सुरेश कंक यांनी आभार मानले.