पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) :- महागाईने कंबरडे मोडलेल्या देशवासीयांना दिलासा देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने कोणत्यागी उपाययोजना केल्या नाहीत. तसे असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीएनजीवर करकपात करून राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. येत्या 1 एप्रिल पासून दर कमी होणार आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महापौर संजोग वाघेरे-पाटील यांनी म्हटले आहे.
या संदर्भात वाघेरे पाटील म्हणाले की, पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या असून देशात महागाईचा भडका उडाल्याचं चित्र आहे. देशवासीयांना महागाईपासून दिलासा देण्याचा विचार केंद्रातील मोदी सरकार करताना दिसत नाही. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरंडं मोडलं आहे. या दरम्यान अर्थसंकल्पात अजितदादा पवार यांनी सीएनजी इंधनावरील मुल्यवर्धीत कराचा (व्हॅट) दर १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्के इतका कमी करण्याची घोषणा केली होती.या प्रमाणे सीएनजी इंधनावरील दर कमी केल्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एप्रिलपासून राज्यात सीएनजी इंधन स्वस्त होणार असून याचा फायदा ऑटोरिक्शा, टॅक्सी चालकांसह, प्रवासी वाहतूक करणारी वाहनं तसंच नागरिकांना होणार आहे. प्रदुषण नियंत्रणासाठीही हा निर्णय महत्त्वाचा आहे. सीएनजीचे कमी झालेले नवे दर येत्या १ एप्रिल २०२२ पासून लागू होतील, असे अजितदादांनी स्पष्ट केले आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात एप्रिल महिन्यापासून सीएनजी गॅस स्वस्त मिळणार आहे. पेट्रोल, डिझेलच्या किंमती वाढल्याने अनेग नागरिकांकडून वाहनांमध्ये, व्यावसायासाठी सीएनजीचा वापर केला जात आहे. सीएनजी गॅसची किंमत सध्या ६६ रुपये इतकी आहे, या निर्णयामुळे एप्रिलपासून ही किंमत आणखी कमी होणार आहे. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. महागाईपासून हा दिलासा मिळवून देण्याचं काम अजितदादा यांच्या माध्यमातून झालं आहे. या निर्णयामुळे नागरिकांकडून लोकहिताचा निर्णय घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे, असे संजोग वाघेरे-पाटील म्हणाले.