– महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना मागणी…
पिंपरी :- पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पात्र लाभार्थींना ४० टक्के स्वहिस्सा रक्कम भरण्यासाठीची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.
याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, आर्थिक दुर्बल घटकातील परवडणाऱ्या दरामध्ये नागरिकांना हक्काचे घर मिळावे म्हणून शहरात प्रधानमंत्री आवास योजना राबवण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात पात्र लाभार्थींना घर मिळण्यास अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत.
शहरातील ज्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे मिळाली आहेत. अशा लाभार्थ्यांनी २८ फेब्रुवारी २०२२ रोजी १० टक्के रक्कम भरली आहे. आता त्यांना १७ मार्चपर्यंत ४० टक्के म्हणजे २ लाख ६७ हजार भरण्यास सांगितले आहे.
वास्तविक, याबाबत कोणतेही पत्र न देता तोंडी आदेश दिल्याचे पात्र लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. त्यातच मार्च महिना सुरू असल्याने बँकेतून कर्ज मिळत नाही. आता मुदतही संपत आली आहे. तसेच, विहित मुदतीत पैसे न भरल्यास लाभार्थ्यांना लाभ मिळणार नसल्याचे महापालिका झोपडपट्टी निर्मूलन पुनर्वसन प्रकल्प विभागाने सांगितले आहे. परिणामी, वेळेत पैशाची तजवीज न झाल्यास काय करावे? असा प्रश्न लाभार्थींपुढे आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये मागील दोन वर्षांत कोरोनामुळे अनेकांचे रोजगार गेले आहेत. व्यवसाय बंद पडले आहेत. या सर्व प्रतिकूल परिस्थितीचा विचार करता आर्थिक दुर्बल घटकांतील लाभार्थींबाबत सकारात्मक विचार करुन पंतप्रधान आवास योजनेतील ४० टक्के हिस्सा भरण्याची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.