पिंपरी (दि. 28 फेब्रुवारी २०२२):- पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथिल एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये ‘मराठी भाषा दिवस’ साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना मराठी भाषादिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपमुख्याध्यापिका पद्मावती बंडा, प्राथमिक आणि पूर्वप्राथमिक विभागाच्या समन्वयिका शुभांगी कुलकर्णी, सह समन्वयिका निरुपमा काळे, वंदना सांगळे, अर्चना प्रभूणे, स्नेहल कोकरे, मंजुषा नाथे, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
मराठी अस्मितेचा केंद्रबिंदू छत्रपती शिवाजी महाराजांवर विद्यार्थी शौर्य साळुंखे याने सादर केले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा पोवाडा गौरव माळी व सहका-यांनी सादर केला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथी चे औचित्य साधून सुनिता पाटील यांनी सावरकरांच्या जीवनपटाची माहिती दिली. दहावीची विद्यार्थिनी त्रिवेणी मस्के हीने मराठी दिनाची महती व वैशिष्ट्ये सांगितले. दहावीच्या विद्यार्थिनींनी ‘मराठी फ्युजन नृत्याविष्कार’ सादर करून कार्यक्रमाला बहार आणली. या नृत्यास नृत्यशिक्षक अजय सर यांनी नृत्यदिग्दर्शन केले. भारतरत्न गानकोकिळा लता मंगेशकर यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कार्यावर आधारित संगीतमय चित्रफित कुलदीप यांनी सादर केली. मराठी भाषेला सोन्याचे दिवस प्राप्त करून देण्यासाठी जे अजरामर झाले त्यांना मानवंदना देण्यासाठी ‘मराठी अभिमान गीत’ सादर करण्यात आले. देशपांडे यांनी शिवगर्जना आणि शिवमुद्रा गीत सादर केले. वंदना सांगळे यांनी मंगेशकर कुटुंबीयांचे मराठी भाषा वॄध्दींगत करण्यासाठीचे योगदान याविषयी मार्गदर्शन केले तसेच संतांच्या अभंगांना अप्रतिम चालींमध्ये संगीतबद्ध केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, सचिव विठ्ठल काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनीही विद्यार्थ्यांना मराठी दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
इशिता देवशेतवार या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले, आभार वंदना सांगळे यांनी मानले.
———————————————-