-माजी उपमहापौर तुषारभाऊ हिंगे यांच्या प्रयत्नांतून साकारले प्रकल्प
पिंपरी (प्रतिनिधी) – माजी उपमहापौर तथा विद्यमान नगरसेवक तुषारभाऊ हिंगे यांच्या विशेष प्रयत्नातून चिंचवड येथील केएसबी चौकात कामगारांचे दैवत कै. अण्णासाहेब पाटील स्मारक, तसेच बर्ड व्हॅली उद्यानात म्युझिकल फाऊंटन या दोन्ही प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या या दोन्ही प्रकल्पाचे लवकरच लोकार्पण होणार आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात तुषार हिंगे म्हणाले की, “उद्योगनगरीतील केएसबी चौक हा मुख्य चौक म्हणून ओळखला जातो. या चौकात कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. कामगार बांधवांचे प्रेरणास्रोत म्हणून या पुतळा आणि परिसराकडे पाहिले जाते. या परिसरातील सुशोभीकरणाचे करून स्मारक विकसित करण्यात आले आहे. या स्मारकासाठी १ कोटी ७२ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. यासह महानगरपालिकेच्या माध्यमातून शहराच्या वैभवात भर घालणारा प्रकल्प म्हणजे संभाजीनगर येथील बर्ड व्हॅली उद्यानातील म्युझिकल फाउंटन व लेझर शो आहे.
लेझर व व्हिडीओ प्रोजक्टरद्वारे वॉटर स्क्रिनवर शहराची जडण घडण दाखविण्यात येणार आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकाराम महाराजांची भेट, चापेकर बंधू, वारकरी संप्रदाय या ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक घटनांचे चित्र नागरिकांना दाखविले जाणार आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेमार्फत १० कोटी ७० लाख रुपये खर्च मंजूर करण्यात आला. दोन्ही प्रकल्पामुळे शहराच्या नावलौकिकात भर पडणार आहे. त्याचे उर्वरित किरकोळ कमे लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांसाठी हे प्रकल्प खुले करणार आहोत. या दोन्ही प्रकल्पाचा उद्घाटन समारंभ लवकरच पार पडणार आहे”