पिंपरी:- भाजपाच्या भ्रष्ट कारभाराला पिंपरी चिंचवड शहरातील जनता वैतागली आहे. त्याचा रोष आज सगळीकडे व्यक्त होत आहे. सगळ्या गोष्टीत भ्रष्टाचार करणाऱ्या महापालिका सत्ताधाऱ्यांनी गरिबांच्या खिशावर डल्ला मारला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत सत्ताधारी भाजपाला उलथवून टाकू असे आवाहन माजी आमदार विलास लांडे यांनी केले. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा महापालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकवत एकहाती सत्ता आणणार असल्याचे प्रतिपादन लांडे यांनी केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारा विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने ‘चले जाव भाजपा’ हे आंदोलन छेडले. या वेळी माजी आमदार विलास लांडे बोलत होते.
चिंचवड स्टेशन येथून मोर्चाला सुरुवात झाली. पिंपरी चिंचवड महापालिकेसमोर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. या वेळी शहराध्यक्ष नगरसेवक अजित गव्हाणे, आमदार अण्णा बनसोडे, महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट, माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नाना काटे, विरोधी पक्षनेता राजू मिसाळ, योगेश बहल, मंगला कदम, वैशाली काळभोर, सुलक्षणा शिलवंत, जगदिश शेट्टी, राहुल भोसले, प्रशांत शितोळे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, युवती अध्यक्षा वर्षा जगताप, विराज लांडे
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो, भ्रष्टाचारी सत्ताधारी चले जाव, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा विजय असो आदी घोषणा देण्यात आल्या.
माजी आमदार विलास लांडे म्हणाले की, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हा मोर्चा म्हणजे भ्रष्टाचारावर हल्लाबोल आहे. महापालिकेतील भ्रष्ट सत्ता घालवून त्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्य लोकांच्या हाती सत्ता आणायची आहे. राष्ट्रवादीने सत्ता असताना सर्वसामान्य लोकांची कामे केली. महापालिकेत विरोधी पक्षात असताना सर्वसामान्य लोकांचे प्रश्न राष्ट्रवादीतील लोकप्रतिनिधिनी महापालिकेत मांडले. सत्ताधारी भाजपाने इंद्रायणी नदीत सुधार प्रकल्पात घोटाळा केला, स्मार्ट सिटीच्या नावाखाली स्वतःचे खिसे भरले, पाणी पुरवठा नियोजनात अपयश आले, कचऱ्याच्या प्रकल्पात घरातील लोकांना स्वतःच्या बगलबच्चना ठेका देऊन पैसे लाटले, चुकीचा वाढीव खर्च दाखवून निवडणुकांचा फ़ंड गोळा केला, विद्यार्थ्यांच्या गुडफिल किट मध्ये देखील पैसे खाल्ले अशा एक ना अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे आहेत. त्या बाबत मी सातत्याने आवाज उठवून उपमुख्यमंत्री अजित पवार व महाविकास आघाडीच्या संबंधित मंत्र्यांकडे देखील पाठपुरावा केला आहे.
आता एकजुटीच्या ताकदीवर तसेच पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादीला सत्तेत आणू आणि या भ्रष्टाचारी सत्ताधाऱ्यांना महापालिकेतून पायउतार करु, असे प्रतिपादन माजी आमदार विलास लांडे यांनी केले. त्यासाठी महिला, युवक, युवतींनी सज्ज होण्याचे आवाहन लांडे यांनी केले.