३० लाख रुपये घेऊनही फ्लॅट न देता एकाची आर्थिक फसवणूक; पिंपळेगुरवमधील अरूण पवार यांना सांगवी पोलिसांनी केली अटक
पिंपरी, दि.५ (प्रतिनिधी) – फ्लॅटसाठी ३० लाख रुपये घेऊन सुद्धा ती न देता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी पिंपळेगुरव येथील साईराम डेव्हलपर्सचे अरूण पवार आणि भागीदार जीवन जाधव यांच्याच्याविरोधात सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील अरूण पवार यांना पोलिसांनी शुक्रवारी (दि.४) अटक केली आहे. अरूण पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष आहेत.
याप्रकरणी सचिन मोतीलाल कवडे (वय ४३, रा .श्रीनिवास बिल्डिंग, आदर्शनगर, पिंपळेगुरव) यांनी फिर्याद दिली आहे. अरूण श्रीपती पवार (वय ४९, रा. बालाजी कृपा, भगतसिंग चौक, पिंपळेगुरव) आणि जीवन जगन्नाथ जाधव (रा. जाधववाडा, भैरवनाथ मंदिराजवळ, पिंपळेगुरव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरूण पवार आणि जीवन जाधव हे दोघे बांधकाम व्यावसायिक आहेत. दोघेही साईराम डेव्हलपर्समध्ये भागीदार आहेत. त्यांनी वाकमडमध्ये साई पार्क या नावाने इमारत बांधली आहे. अरूण पवार यांनी २०१६ मध्ये फिर्यादी सचिन कवडे यांना साई पार्क या इमारतीतील एक फ्लॅट घेण्याची विनंती केली. त्यानुसार सचिन कवडे यांनी फ्लॅट घेण्याची तयारी दाखवून १ डिसेंबर २०१६ ते ७ ऑगस्ट २०१८ या कालावधीत आरोपी अरूण पवार यांना त्यांच्या कार्यालयात रोख १७ लाख रुपये आणि आरोपी जीवन जाधव यांनी चेकने १३ लाख रुपये घेतले. कायद्याने चेकचे पैसे रेरा बँक खात्यावर घेणे बंधनकारक असताना दोन्ही आरोपींनी वैयक्तिक साईराम बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्सच्या नावाने चेक घेतले.
त्यानंतर आरोपी अरूण पवार यांनी १ डिसेंबर २०१६ रोजी सचिन कवडे यांनी साईराम बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपर्सची फ्लॅट बुकिंग पावती दिली असून, त्यामध्ये ५० लाख ८९ हजार ७६६ रुपयांना फ्लॅट दिल्याचे दाखवले आहे. तसेच अरूण पवार व जीवन जाधव या दोन्ही आरोपींनी वाकडमधील साई पार्क या इमारतीतील फ्लॅट क्रमांक ३०१ हा सचिन कवडे यांना करारनाम्यावर सही करून दिलेला असतानाही हाच फ्लॅट २०१८ मध्ये वानखेडे नावाच्या व्यक्तीला विकला आहे. सचिन कवडे यांच्याकडून ३० लाख रुपये घेऊन, करारनामा करून देखील त्यांना त्यांचा फ्लॅट न देता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी अरूण पवार यांना पोलिसांनी अटक केली आहे. सांगवी पोलिस अधिक तपास करत आहेत.