महापौर उषा ऊर्फ माई ढोरे व आयुक्त राजेश पाटील यांची माहिती…

पिंपरी चिंचवड,१९ जानेवारी २०२२ :- शहरांमधील अतिक्रमीत व मृत रस्ते नागरिकांसाठी खुले होण्यासाठी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे सन २०२० मध्ये Streets4 People Challenge हा उपक्रम राबविण्यात आला होता. यामध्ये, देशभरातील ११३ शहरांमधून पिंपरी चिंचवड शहराची सर्वोच्च पुरस्कार यादीत पहिल्या ११ शहरांमध्ये निवड झाली आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या नावलौकीकात भर घालणा-या या कामगीरीचे देश पातळीवर कौतुक होत आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड महापालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर श्रीम. उषा ऊर्फ माई ढोरे व आयुक्त् श्री. राजेश पाटील यांनी दिली.

शहरे ही लोकांसाठी आहेत, स्वत:च्या शहराची रचना करताना नागरिकांचा सहभाग करून घेणे अत्यंत गरजेचे आहे, या अनुषंगाने देश पातळीवर Streets4People Challenge ही संकल्पना राबविण्यात आली होती. डिझाईन स्पर्धा,व्यावसायिक दृष्टीकोन, विद्यार्थी आणि इतर संस्थांचा समावेश करून घेत शहरांमध्ये सर्जनशील उपाय विकसित करणे आणि त्याची चाचणी घेणे, लोकांचे मते ऐकुण घेणे तसेच त्यांच्या समस्या समजून त्यावर मार्ग काढणे हे “स्ट्रीट्स 4पीपल चॅलेंज” या उपक्रमाचे उददेश्य आहे. या योजनेमध्ये चालणे आणि प्लेसमेकिंग उपक्रमांचा विस्तार करणे आणि कायमस्वरूपी पायाभूत सुविधांमध्ये रूपांतर करणे ही बाब समाविष्ट आहे.

नॅशनल अर्बन ट्रान्सपोर्ट पॉलिसी (2006) च्या अनुषंगाने भारत सरकारने सन २०२० मध्ये, १०० हून अधिक शहरांना सुरक्षित, आनंदी आणि निरोगी सार्वजनिक जागा म्हणून रस्त्यांची पुनर्कल्पना व नागरिकांना प्रेरित करण्यासाठी Streets4 People Challenge हा उपक्रम हाती घेतला आहे. ज्यामध्ये, लोक केंद्रित रस्त्यांची गरज लक्षात घेण्यात आली आहे. यात, पिंपरी चिंचवड शहराची “चालणे आणि सायकलिंग चॅम्पियन्स”करीता निवड करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये या उपक्रमांतर्गत प्राधिकरणातील तीन रस्त्यांसाठी स्ट्रीट डिझाईन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये, वास्तुविशारद, सिव्हील इंजिनिअरींगचे विद्यार्थी, व्यावसायिक यांच्या सहभागातून तीन पैकी एका रस्त्यावर टेक्नीकल अर्ब‍निझमचा प्रयोग करून पादचारी व सायकलस्वारांसाठी रस्ता तयार करण्यात आला होता. नॉन मोटराईज ट्रान्सपोर्ट (NMT) इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अग्रणी असलेल्या, पिंपरी चिंचवड शहराने स्ट्रीट डिझाईन सल्लागारांसोबत शहरव्यापी हरित सेतू मास्टरप्लॅन पुढे नेण्यासाठी काम केले असून स्वतंत्र सायकल लेन आणि फूटपाथ तयार करून विविध रंगरंगोटीद्वारे नागरिकांसाठी रस्ते खुले करण्यात आले आहेत. तसेच, स्मार्ट सिटी अंतर्गत अनेक ठिकाणी अर्बन स्ट्रीटनुसार रस्ते व फुटपाथ तयार करण्यात येत आहे.

देशभरात या योजनेद्वारे १५० हून अधिक मोहिमा राबविण्यात आलेल्या आहेत. यामध्ये, देशभरातील ६०० हून अधिक नागरी समाज संस्था व २००० पेक्षा जास्त डिझायनर, नियोजक आणि वास्तुविशारदांनी सहभाग नोंदविला. सर्वोच्च ११ पुरस्कार प्राप्त शहरांमध्ये पिंपरी चिंचवड, औरंगाबाद, बेंगळुरू, गुरुग्राम, कोची, कोहिमा, नागपूर, पुणे, उदयपूर, उज्जैन, विजयवाडा या शहरांची निवड करण्यात आली आहे. तसेच, इंफाळ, कर्नाल, सिल्वासा, वडोदरा या शहरांची विशेष कामगीरीबाबत निवड झाली आहे. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात, स्पर्धेत सहभागी शहरांनी ‘हेल्दी स्ट्रीट्स’चे शहरव्यापी नेटवर्क तयार करण्याच्या दृष्टीकोनातून काम केले. मोकळ्या सार्वजनिक जागा, मनोरंजन आणि मानसिक आरोग्यासाठी तातडीची गरज लक्षात घेवून लोकांसाठी रस्ते विकसीत करण्यात आली.

शहरांमधील रस्त्यांची चालण्याजोगी योग्यता आणि राहणीमान यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. शहरे आर्थिक आणि सामाजिक कल्याण पुनर्प्राप्त करू शकतात, असे या उपक्रमातून निदर्शनास आले आहे. चालणे आणि सायकलिंगसाठी रस्त्यावर सुधारणा केल्याने शहरातील किरकोळ विक्री तब्बल ३०% पर्यंत वाढू शकते, असे ट्रान्सपोर्ट फॉर लंडनच्या अहवालातून निदर्शनात आलेले असून ट्रीट्स 4पीपल चॅलेंज साठी सहभागी झालेल्या ११३ शहरांमध्ये मोठा बदल दिसून आला आहे. यामध्ये, प्रस्ताव सादर केलेल्या ३८ शहरांपैकी, १५ शहरे अनुकरणीय नेतृत्व, सर्जनशील ऑन-ग्राउंड परिवर्तन आणि नागरिकांसह व्यापक सहकार्याचे प्रदर्शन करण्यासाठी म्हणून निवडली गेली. स्मार्ट सिटीज मिशन आणि इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रान्सपोर्टेशन अँड डेव्हलपमेंट पॉलिसी (ITDP इंडिया) यांच्या 25 जणांच्या टीमद्वारे एका नाविन्यपूर्ण क्षमता विकास कार्यक्रमाद्वारे पाठिंबा दिला जात असल्याची माहिती पिंपरी चिंचवड महापालिका महापौर श्रीम. उषा ऊर्फ माई ढोरे व आयुक्त श्री. राजेश पाटील यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *