उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मा. आमदार विलास लांडे यांनी केले अभिनंदन…
भाजपाच्या राज्यात विटंबना तर महाविकास आघाडीने जपली महाराष्ट्राची अस्मिता…
पिंपरी (प्रतिनिधी) – स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारक उभारणीच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली. एककीडे भाजपाची सत्ता असलेल्या कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना केली जाते. तर, दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारकडून संभाजी महाराजांचे भव्यदिव्य स्मारक उभारण्यास मंजुरी दिली जाते. अजितदादा नेहमीच मराठी माणसाची अस्मिता जपण्याचे कार्य करत आले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना निगडीतील भक्ती-शक्ती समुह शिल्प उभारले. भोसरीतील लांडेवाडी चौकात शिवश्रृष्टी उभा केली. आणि आता वढु ब्रुद्रुक (ता. हवेली, जि. पुणे) येथील संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्याला मंजुरी दिली. याबद्दल भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादांचे अभिनंदन केले आहे.
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. महाराजांनी तमाम रयतेच्या हितासाठी दिलेल्या लढ्यातून महाराष्ट्राची अस्मिता उभी राहिलेली आहे. स्वराज्याच्या रक्षणासाठी, विस्तारासाठी त्यांनी दिलेले अफाट योगदान महाराष्ट्र कदापी विसरणार नाही. महाविकास आघाडी सरकारने छत्रपती संभाजी महाराज यांचे मोठेपण जपले आहे. महाराजांच्या गड किल्ल्यांचे संवर्धन व्हावे, त्यांच्या ऐतिहासिक आठवणींना उजाळा मिळावा, त्यांच्या ऐतिहासिक ठेव्यांसाठी भव्य संग्रहालय साकारण्यात यावे, तेथील परिसराचे सुशोभिकरण व्हावे, संभाजी महाराजांची ग्रंथसंपदा वाचकप्रेमींसाठी उपलब्ध असावी, अशा अनेक मुद्द्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. त्यावर अजितदादांनी याची दखल घेऊन स्मारक उभारण्यास मंजुरी दिली. राज्य सरकार करोडो रुपये खर्चून वढु बुद्रुक येथे सर्व सोयींनी सज्ज असे महाराजांचे स्मारक उभारणार आहे. या निर्णयाबद्दल उपमुख्यमंत्री अजितदादांचे मी आभार मानतो, असे माजी आमदार लांडे यांनी म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वी कर्नाटकातील बंगलुरू येथे काही समाजकंटकांनी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना केली. कर्नाटक राज्यात भाजपाची सत्ता आहे. केंद्रात सुध्दा भाजपाचेच सरकार आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा हे पुण्याच्या दौ-यावर आहे. महाराजांच्या पुतळा विटंबन प्रकरणाची उच्च स्तरीय चौकशी करण्याची साधी मागणी देखील भाजपाच्या कोण्या खासदार, आमदाराने त्यांच्याकडे केली नाही. या घटनेचा वरिष्ठ स्तरावर साधा निषेध देखील केला नाही. निवडणुकीत मते मागण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा वापर करायचा. आणि एरव्ही महाराजांची विटंबना झाली तरी त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करायचे, ही भाजपाची चाल आहे. परंतु, महाराष्ट्रातील तमाम जनता भाजपाची ही चाल मोडून काढल्याशिवाय राहणार नाहीत, असे आव्हान देखील माजी आमदार लांडे यांनी दिले आहे.
स्थानिकांना विश्वासात घेऊन आराखडा तयार होईल
वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो नागरिक येतात. दर्शनासाठी येणाऱ्या चाहत्यांची योग्य सोय व्हावी, छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे पावित्र्य जपून परिसराच्या विकासाचे काम, सर्वांच्या संमतीने, सर्वांना सोबत घेऊन भव्यदिव्य स्वरुपात करण्यात येणार आहे. या स्मारकाची उभारणी भव्यदिव्य करण्यासाठी स्मारकाच्या आराखड्यासाठी स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट आराखड्याची निवड करण्यात येईल. या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी तसेच सर्वसामान्यांकडून येणाऱ्या चांगल्या सूचनांचे स्वागत करुन त्याचा अंतर्भाव सुधारित आराखड्यात करण्यात येईल. स्मारक उभारणीचे काम करताना स्थानिकांशी चर्चा करुन सर्वांना विश्वासात घेऊनच काम करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजितदादांनी दिले आहेत.
महापालिकेच्या प्रकल्पाआडून समाजाची दिशाभूल
उपमुख्यमंत्री अजितदादांचे हे कार्य हिंदुभूषणच्या नावाखाली स्वतःची टिमकी वाजवणा-या स्थानिक नेत्यांना चपराक बसवणारे आहे. कारण, अजितदादांनी मंत्रीमंडळात एखादा निर्णय घेताना कधीही गाजावाजा केला नाही. मोठेपणाने आम्ही हे केले म्हणून कधी सांगितले नाही. परंतु, ज्यांच्या हाती काहीच नाही, त्यांनी मात्र महापालिकेच्या प्रकल्पावर दावा ठोकून समाजाची दिशाभूल केली आहे. असले खोटे जास्त दिवस चालत नाही, आज न उद्या याची परतफेड करावीच लागणार आहे, असे ही माजी आमदार लांडे यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *