पिंपरी (दिनांक : २२ नोव्हेंबर २०२१):- “दुर्दम्य इच्छाशक्तीचे चैतन्यमय प्रतीक म्हणजे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे व्यक्तिमत्त्व होते!” असे भावोत्कट उद्गार ज्येष्ठ कवयित्री आणि बाबासाहेब पुरंदरे यांची पुतणी वर्षा बालगोपाल यांनी जिजाऊ पर्यटन केंद्र, चिंचवडगाव येथे रविवार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२१ रोजी काढले. आयुष्यभर शिवचरित्राचा प्रचार अन् प्रसार करणारे ज्येष्ठ शिवशाहीर, पद्मविभूषण बळवंत मोरेश्वर तथा बाबासाहेब पुरंदरे यांचे नुकतेच वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील विविध साहित्य संस्थांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पिंपरी-चिंचवड साहित्य संवर्धन समितीने श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते.

याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले, राज अहेरराव, सुरेश कंक, सविता इंगळे, कैलास भैरट, ज्येष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे, नंदकुमार मुरडे, प्रकाशक नितीन हिरवे, दुर्गप्रेमी वसंत ठोंबरे, कवी राजू जाधव यांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेब पुरंदरे यांच्या सार्वजनिक जीवनातील विविध पैलूंना उजाळा दिला. कवयित्री शोभा जोशी आणि सुप्रिया लिमये यांनी आपल्या कवितांमधून पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्त्वातील वैशिष्ट्ये मांडलीत; तर बाबासाहेब पुरंदरे यांचे आप्तेष्ट बाळासाहेब मोकाशी यांनी त्यांच्या चिंचवडगावाशी संबंधित हृद्य आठवणी जागविल्या.

वर्षा बालगोपाल पुढे म्हणाल्या की, “चिरतरुण राहायचे असेल तर मनातील लहान मुलाला कायम जपा. चैनीत जगायचे असेल तर बेचैन; पण निर्व्यसनी रहा, अशी शिकवण त्यांनी नेहमीच समाजाला दिली. त्यांना अखेरपर्यंत शिवसृष्टीचा ध्यास होता; मात्र वयाची शंभरी पूर्ण करण्याची त्यांची इच्छा अपूर्ण राहिली!”

प्रा. तुकाराम पाटील, सुहास घुमरे, जयश्री श्रीखंडे, विनोद चटप, नीलेश शेंबेकर, अशोक गोरे, बाळासाहेब सुबंध, तानाजी एकोंडे, सुभाष चव्हाण, यशवंत देशपांडे, मल्लिकार्जुन इंगळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *