योगेश बहल यांनी आयुक्तांना दिले स्मरणपत्र

प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने महापालिकेच्या विविध रुग्णालयांना मेडिकल, पॅरामेडिकल कर्मचारी पुरविणेबाबत निविदा (क्र. 10/2021-22) प्रसिद्ध केली होती. या निविदेमध्ये सहभागी झालेल्या श्रीकृपा सर्व्हिसेस प्रा. लि. या ठेकेदाराने महापालिकेला खोटी कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याबाबतचे प्रकरण मी आपल्या निदर्शनास आणून दिलेले आहे.

सदर ठेकेदाराकडे निविदेतील अनुभवाची अट पूर्ण करण्याबाबत कोणताही अनुभव नसताना संबंधिताने अनुभवासाठी साई मेडिक्यूअर सर्व्हिसेस प्रा.लि. यांचे वरळी येथील साई हॉस्पीटल, 3 एएम मेडिकोरम प्रा. लि. यांचे कोंढवा येथील लाईफ लाईन हॉस्पीटल, आळेफाटा येथील ओम चैतन्य हॉस्पीटल, चेंबुर येथील ओम साई आरोग्य केअर प्रा.लि. या कंपनीला मेडिकल,पॅरामेडिकल कर्मचारी पुरविल्याचा अनुभवाचा बोगस दाखला निविदा प्रक्रियेसोबत जोडला आहे.सदर दाखले हे पूर्णत: बोगस असून जे चार अनुभवाचे दाखले जोडले आहेत त्या कोणत्याही संस्थेला श्रीकृपा सर्व्हिसेस यांनी मनुष्यबळ पुरविलेले नाही. आम्ही त्याबाबत खातरजमा करून या बोगसगिरीचे सर्व पुरावे आपल्याला उपलब्ध करून दिल्यानंतरही महिनाभरापासून या ठेकेदारावर कारवाई करण्यास दिरंगाई करून त्यास पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू आहे. महापालिका प्रशासनातील काही अधिकारी व सत्ताधारी भाजपाच्या नेतेमंडळींचे आर्थिक हित साधण्यासाठी केलेला हा गंभीर प्रकार झाकण्याचा प्रकारच सुरू असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. याबाबत मी आपणास वारंवार पत्रव्यवहार करून तसेच स्मरणपत्र देऊन महापालिकेची फसवणूक करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याबाबत मी विनंती केलेली आहे.

यानंतरही सुरू असलेली दिरंगाई ही अत्यंत गंभीर व फौजदारी कारवाईस पात्र ठरणार आहे.श्रीकृपा सर्व्हिसेस चार कंपन्यांचे जे अनुभवाचे दाखले जोडलेले आहेत त्याबाबत कोणताही व्यवहार झालेला नाही. श्रीकृपा सर्व्हिसेसने दाखविलेल्या अनुभवानुसार त्यांनी त्यांच्या इन्कमटॅक्स रिटर्नमध्ये त्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.अथवा ज्यांनी अनुभवाचे दाखले जोडले आहेत त्यांच्याही इन्कमटॅक्स रिटर्नमध्ये याबाबत नोंदी नाहीत. पीएफ, इएसआयसी, टीडीएस,जीएसटी व कामगार कल्याण विभागाकडे याबाबत कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नसून वरील करारनामे व व्यवहारापोटी शासकीय कार्यालयांमध्ये कोणतीही माहिती आढळून येत नाही. तसेच जे अनुभवाचे दाखले जोडण्यात आलेले आहेत ते एकाच संगणकावर बनविण्यात आल्याचे दिसून येत असून एकाच प्रिंटरवरून त्याची प्रिंट काढल्याचेही आम्ही आपल्या निदर्शनास आणून दिलेले आहे. महापालिकेची फसवणूक करण्याच्या व निविदा प्रक्रियेद्वारे आर्थिक हित साधण्याच्या हेतूने ही कागदपत्रे सादर केलेली आहेत. यामध्ये महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांचाही सहभाग असल्याचे समोर येत आहे. श्रीकृपा सर्व्हिसेसने वरील चार संस्थांना जे मनुष्यबळ पुरविले त्यांच्या नावाची, पत्ता व फोन क्रमांकासह यादी,शैक्षणिक प्रमाणपत्र, वेतन अदा केल्याचे दाखले, बँक स्टेटमेंट, डॉक्टरांचे जीएसटी भरलेचे दाखले, आया, वॉर्डबॉय यांचे पीएफ, इएसआयसी भरलेले दाखले मागविल्यास श्रीकृपा सर्व्हिसेस या ठेकेदाराचा खोटारडेपणा समोर येईल, हे देखील आम्ही आपल्या निदर्शनास आणून दिलेले होते. मात्र आपण त्याबाबत महिनाभरात कोणतीही कारवाई केलेली नसल्याचे दिसून येत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे या ठेकेदाराची चौकशी करण्याऐवजी महापालिकेची फसवणूक केल्याची बक्षीसी म्हणून या ठेकेदाराला आरोग्य विभागातील कोट्यवधींचे रस्ते साफसफाईचे काम देण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि क्लेशदायक आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत या ठेकेदाराला नविन कोणतेही काम देऊ नये तसेच वैद्यकीय विभागाने जे मनुष्यबळ जे पुरवठ्याचे काम दिले आहे त्याबाबत कोणतेही बिल अदा करण्यात येऊ नये. चौकशी पूर्ण होण्यापुर्वी आपण कोणतही रक्कम अदा केल्यास सदर रक्कमेची जबाबदारी आयुक्त या नात्याने आपली राहिल याचीही आपण नोंद घ्यावी.

महापालिकेची खोट्या कागदपत्रांद्वारे फसवणूक करणे हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा प्रकार असल्याने महापालिका आयुक्त या नात्याने आपण त्यावर तात्काळ कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र आपण कोणतीच कारवाई न करता सत्ताधारी भाजपाच्या दबावाखाली आपण काम करत असल्याचेच यावरून दिसून येत आहे. ही बाब महापालिकेच्या सन्मानाला ठेच पोहोचविणारी असून भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारास पाठीशी घालणारी ठरत आहे. आपणास या पत्राद्वारे स्पष्ट करू इच्छितो की,महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार तसेच भारतीय दंडविधानातील फौजदारी कलमानुसार आपण पुढील आठ दिवसांत महापालिकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदार व अधिका-यांवर कडक कारवाई करून काळ्या यादीत न टाकल्यास आपणाविरोधात उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली जाईल. या संपूर्ण भ्रष्टाचार आणि बोगसगिरीला आपण पाठीशी घालत असल्यामुळे आपणासही प्रतिवादी करण्यात येईल. तसेच या प्रकरणी पोलिसांकडेही तक्रार नोंदविण्यात येईल. या नंतर होणाऱ्या कोणत्याही परिणामांस आपण आयुक्त या नात्याने जबाबदार रहाल, याची नोंद घ्यावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *