पिंपरी : पिंपळे सौदागर व रहाटणी प्रभागातील अनेक भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याने नागरिकांना पाण्याची समस्या जाणवत होती. यासाठी स्थानिक नगरसेवक नाना काटे व शितल नाना काटे यांनी पुढाकार घेवून प्रभागात पाणी समस्या निकालात काढण्यासाठी दोन पाण्याच्या टाकीचे उभारणी करून घेतली आहे. आज महापालिकेच्या पाणी पुरवठा अधिकारी यांच्या समवेत पिंपळे सौदागर मधील गावठाणातील टाकीची पाहणी केली. यावेळी सहशहर अभियंता रामदास तांबे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अजय सूर्यवंशी, अभियंता चंद्रकांत मोरे, उपअभियंता वैभव विटकरे, अमृत योजनेचे ठेकेदार विनोद पवार, डीआरए कंपनीचे सल्लागार अनुप शहा आदी उपस्थित होते.
प्रभागातील पाणी समस्या निकालात काढण्यासाठी दोन पाण्याच्या टाक्या बांधण्यात याव्या यासाठी वेळोवेळी स्थानिक नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे व नगरसेविका सौ. शितलताई नाना काटे पाठपुरावा केला होता. त्याच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यामुळे आज पिपंळे सौदागरमध्ये नवीन दोन पाण्याच्या टाक्या बांधून पूर्ण झालेल्या आहेत. पिपंळे सौदागर गावठाणमधील जुनी ७ लाख लिटरची पाण्याची टाकी पाडून तिथे १५ लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. टाकीचे बांधकाम वॉश आउट करून येत्या आठ दिवसात पाणीपुरवठा चालू करण्याच्या सूचना नगरसेवक नाना काटे यांनी दिल्या आहेत.पिंपळे सौदागर गावठाणातील टाकीवरून पिंपळे सौदागर गावठाण, केशवनगर, सेवन स्टार लेन, गणेशम सोसायटी, काटे वस्ती, स्वराज गार्डन जवळील भाग आदी परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे पिंपळे सौदागर परिसरातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी मिळेल. तसेच कुणाल आयकॉन रोडवरील रोझलँड सोसायटी शेजारील राजमाता जिजाऊ उद्यानात २० लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधून वॉश आउट करून काम अंतिम टप्यात आहे. या टाकीतून डिसेंबर २०२१ च्या अखेरीस कुणाल आयकॉन रोडवरील सर्व सोसायटय़ा व परिसराला पाणीपुरवठा केला जाणार आहे अशी माहिती नाना काटे यांनी दिली.