पिंपरी (दि. 21 ऑक्टोबर 2021) :- यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात एका महिलेच्या चेहर्‍यावरील हाडाची अतिशय दुर्मिळ आणि क्लिष्ट अशी शस्त्रक्रिया करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. याबाबत अधिक महिती देताना डॉ. यशवंत इंगळे यांनी सांगितले की, जनाबाई विटकर,(वय 48, रा. अहमदनगर) ही महिला खाण कामगार आहे. 18 वर्षांपूर्वी खाणीमध्ये काम करत असताना सुरूंगातून उडालेला दगड या महिलेच्या चेहर्‍याच्या हाडावर लागून दुखापत झाली होती. या दुर्घटनेनंतर त्यांच्या चेहर्‍याच्या उजव्या बाजूच्या हाडावर गाठ वाढली होती. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ही गाठ खूप दुखत होती. तसेच गाठीमुळे विटकर यांचा चेहरादेखील विद्रुप दिसत होता.
जनाबाई विटकर या उपचारासाठी यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या दंतरोग विभागात अ‍ॅडमिट झाल्या होत्या. डॉक्टरांनी रुग्णाच्या चेहर्‍याच्या सर्व तपासण्या केल्यानंतर चेहर्‍याच्या हाडाचा झायगोमॅटिक हेमॅनजिओमा हा अतिशय दुर्मिळ आजार झाल्याचे निष्पन्न झाले. या आजाराची जागतिक आकडेवारीनुसार आतापर्यंत फक्त 20 रुग्ण आढळले आहेत. अशा या अत्यंत दुर्मिळ आणि क्लिष्ट आजारावर शस्त्रक्रिया करणे अत्यंत जोखमीचे काम होते.

प्राथमिक निदानानंतर अजूनही काही महत्त्वाच्या सीटी स्कॅन, एमआरआय, सीटी अ‍ॅन्जिओग्राफी आणि एम्बॉलायझेशन अशा तपासण्या करण्यात आल्या. त्यानंतर शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या चेहर्‍याच्या हाडावर वाढलेली गाठ काढण्याचा निर्णय घेण्यात आला. अतिशय दुर्मिळ आणि डॉक्टरांसाठी आव्हान ठरलेल्या या आजारावर शस्त्रक्रिया करण्यात यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील डॉक्टर यशस्वी ठरले आहेत. डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली दंतरोग विभागप्रमुख डॉ. यशवंत इंगळे, प्लास्टिक सर्जन डॉ. दीपक पाटील, डॉ. स्नेहा दाभाडे, डॉ. संजीवनी कदम, डॉ. सारिका ढमाले या निवासी डॉक्टरांनी अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करून दाखविल्याबद्दल सर्व स्तरातून या टीमचे कौतुक होत आहे. पॅथॉलॉजी विभागप्रमुख डॉ. तुषार पाटील यांनी आजाराच्या निदानासाठी व रुग्णाच्या खर्चिक तपासण्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *