पिंपरी (दि. 8 ऑक्टोबर 2021) :- केंद्र सरकारने शेतक-यांची मागणी नसतानाही शेतक-यांचे हित डावलून भांडवलदारांना फायदेशीर ठरतील असे काळे कायदे केले आहेत. हे कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी मागील दहा महिन्यांपासून दिल्लीच्या सीमारेषांवर शेतकरी आंदोलन करीत आहेत. या आंदोलकांना पाठिंबा देणा-या निरपराध नागरिकांवर वाहने घालून त्यांना चिरडून ठार करण्यात आले. याचा निषेध करण्यासाठी सोमवारी (दि. 11 ऑक्टोबर) महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या महाराष्ट्र बंदमध्ये रिपब्लिकन युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे. हुकूमशाही पध्दतीने वागणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व भाजपाचा निषेध करावा असे आवाहन रिपब्लिकन युवा मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष राहूल डंबाळे यांनी केली.
गुरुवारी (दि. 8 ऑक्टोबर) पिंपरी येथे झालेल्या रिपब्लिकन युवा मोर्चाच्या बैठकीत महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होण्याबाबत ठराव संमत करण्यात आला. यावेळी शिवशंकर उबाळे, भारत मीरपगारे, ज्ञानेश्वर बोराटे, अमोल डंबाळे, मेघा आठवले, गंगा चलवादी, बाळासाहेब जाधव, रामभाऊ ठोके आदी पदाधिकारी उपस्थित होते.
राहुल डंबाळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशाचा पोशिंदा बळीराजा आणि घाम गाळून देशाच्या विकासात भर घालणारा कष्टकरी कामगार यांना उध्वस्त करुन गुलामगिरीत ढकलण्याचे षडयंत्र रचले आहे. शेतकरी व कामगाराविरोधी काळे कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी मागील दहा महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन सुरु ठेवले आहे. तसेच देशभरातील सर्व कामगार संघटना याविषयी ठिकठिकाणी आंदोलन करुन केंद्र सरकारचा निषेध करीत आहेत. अशा हुकूमशाही सरकारचा सर्व जनतेने एकत्रित येऊन तीव्र निषेध करावा या उद्देशाने सोमवारी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंद पुकारला आहे. या बंदमध्ये शहरातील सर्व औद्योगिक कारखाने, उद्योजक, संघटीत असंघटीत कामगार, टपरी, पथारी, व्यवसायिक, व्यापारी यांनी स्वयंस्फूर्तीने या सहभागी व्हावे असेही आवाहन रिपब्लिकन युवा मोर्चाचे पक्षनेते राहुल डंबाळे यांनी केले.
————————-