आमदार आण्णा बनसोडे व माजी आमदार विलास लांडे यांनी शरद पवार साहेबांच्या माध्यमातून केलेल्या पाठपुराव्याला यश
पिंपरी :– बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवरील उड्डाणपुलाचे रखडलेले काम लवकरच मार्गी लागणार आहे. पुलाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात करण्यासाठी केंद्रीय संरक्षण विभागाची अंतिम परवानगी नुकतीच मिळाली आहे. देशाचे माजी केंद्रीय संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यात आमदार आण्णा बनसोडे व माजी आमदार विलास लांडे यांना यश आले आहे. आमदार आण्णा बनसोडे आणि माजी आमदार विलास लांडे यानी शरद पवार यांची भेट घेऊन या पुलाच्या कामासाठी केंद्र स्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे. अखेर शरद पवारांच्या माध्यमातून लष्कराच्या हद्दीतील बोपखेल ते खडकी जोडणा-या उड्डाण पुलाच्या कामाचा प्रश्न सुटल्याने बोपखेलवासियांची या त्रासातून कायमची मुक्तता होणार आहे.
बोपखेल गावासाठी दापोडी येथून सीएमई हद्दीतून जाणारा रस्ता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 13 मे 2015 रोजी बंद करण्यात आला. बोपखेल गावासाठी रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेमार्फत मुळा नदीवरील पुल ते खडकीतून जाणारा एलफिस्टन रस्ता ते टँक रस्ता पक्क्या स्वरूपात करण्याच्या अनुषंगाने सर्व्हेक्षण करण्यात आले. 24 जून 2016 रोजी महापालिकेमार्फत संरक्षण मालमत्ता अधिकारी यांच्याकडे बोपखेल वासियांसाठी मुळा नदीवर पुल व पक्का रस्ता बांधण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. संरक्षण मंत्रालयाने काही अटींवर 16 हजार 122 चौरस मीटर संरक्षण खात्याची जागा मुळा नदीवरील पुलासाठी महापालिकेकडे हस्तांतर करण्याची तयारी दाखविली.
हस्तांतरीत जमिनीच्या मुल्यांकनानुसार तेवढीच जमीन संरक्षण विभागाला महापालिकेने दिली पाहिजे, या प्रमुख अटीसह बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवरील पुल बांधण्यास संरक्षण मंत्रालयाने मान्यता दिली. बोपखेल येथील मुळा नदीवरील पुलासाठी संरक्षण विभागाच्या ताब्यातील 16 हजार 122 चौरस मीटर जागेच्या बदल्यात पर्यायी जागा म्हणून संरक्षण विभागाच्या ताब्यातील राज्य सरकारच्या येरवडा येथील 4 हेक्टर 22 गुंठे भुखंडापैकी 25 कोटी 81 लाख रूपये इतक्या सममुल्याची 7 हजार 367.3 चौरस मीटर इतकी जागा प्रदान करण्यात आली. राज्य सरकारला या जागेचे मुल्य 25 कोटी 81 लाख रूपये दिले आहेत.
महापालिकेतर्फे बोपखेल ते खडकीला जोडणा-या मुळा नदीवर बोपखेलवासियांसाठी बांधण्यात येणा-या पुलाचे 4 जानेवारी 2019 मध्ये काम सुरू झाले. महापालिकेने वेगात काम सुरू केले. नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले. परंतु, संरक्षण विभागाच्या जागेवरील काम बाकी होते. ते काम चालू करण्यासाठी संरक्षण विभागाची परवानगी आवश्यक होती. या परवानगीमुळे काम थांबले होते. ती परवानगी मिळविण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न केले. अखेर संरक्षण विभागाकडून कामाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे संरक्षण विभागाच्या जागेवरील पुलाचे काम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
———————–
पिंपरीतील डेअरी फार्मच्या रस्त्याचाही प्रश्न लवकरच सुटणार –
लष्कराच्या हद्दीतील बोपखेल ते खडकी उड्डाणपुलासाठी संरक्षण विभागाची परवानगी मिळावी, यासाठी पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे आणि माजी आमदार विलास लांडे यांनी माजी केंद्रीय संरक्षण मंत्री शरद पवार यांची भेट घेतली. त्यांना निवेदन देऊन परवानगी मिळवून देण्याची मागणी केली होती. पवारांनी संरक्षण मंत्री,सचिवांकडे पाठपुरावा करून बोपखेलवासियांसाठी पुलाच्या कामाला परवानगी मिळवून दिली आहे. परवा मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांच्या बैठकीत दोन दिवसांत पुलाला परवानगी मिळेल असे पवारांनी लांडे यांना सांगितले होते. त्यानुसार काल अंतिम परवानगी मिळाली आहे. त्यामुळे पुलाच्या रखडलेल्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, पिंपरीतील डेअरी फार्मचे कामही मार्गी लावू ,अशी ग्वाही पवारांनी दिली आहे, असे लांडे यांनी सांगितले.