भाजपने साडेचार वर्षात पारदर्शक भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली
‘आर्थिक गुन्हे शाखे’कडून चाैकशी करा, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे देणार तक्रार
प्रतिनिधी– पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या स्थायी समिती सभापतींनी दहा लाखाची लाच मागितली. लाचेचा पहिला हप्ता घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराची देशासह राज्यात नाहक बदनामी होत आहे. गेल्या साडेचार वर्षात भाजपने पारदर्शक कारभाराच्या नावाखाली भ्रष्टाचाराची लक्तरे वेशीवर टांगली आहेत. सत्ताधारी भाजप नेत्यांनी शहराचे दक्षिण-उत्तर संस्थान विभागून घेत महापालिकेतील तिजोरीतील नागरिकांच्या पैशावर दरोडा टाकला आहे. मागील साडेचार वर्षातील भाजपच्या गैरकारभाराची आर्थिक गुन्हे शाखेकडून चाैकशी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती शहरप्रमुख तथा नगरसेवक अॅड सचिन भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
भोसले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, सत्ताधारी भाजपच्या भय आणि भ्रष्टाचारमुक्त पारदर्शक कारभाराचे वाभाडे निघले आहेत. भय आणि भ्रष्टाचार मुक्त, पारदर्शक कारभारात ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’चे आश्वासन देऊन पिंपरी चिंचवड महापालिका भारतीय जनता पार्टी सत्ता मिळाली. मात्र, साडेचार वर्षात महापालिका स्थायी समितीत पहिल्या वर्षापासून स्थायी समितीत दहा ते बारा टक्के पर्यंत ‘टक्केवारी’घेवून शहरातील विकास कामांचा खेळखंडोबा केला आहे. ठेकेदारांना त्रास देवून विकास कामे निकृष्ट दर्जांची कामे करण्यास भाग पाडल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच भाजपच्या सत्तेत टक्केवारीचे प्रमाण अव्वाच्या सव्वा वाढले होते.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या इतिहासात हा काळा दिवस आहे. सत्ताधारी भाजपचा भ्रष्टाचारी चेहरा उघडा पडला आहे. जनतेने मोठ्या अपेक्षेने भाजपला सत्ता दिली होती. त्या सत्तेचा दुरुपयोग करुन भाजप पदाधिका-यांनी पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारुन स्वतःच्या तुंबड्या भरण्याचे काम केले आहे. भ्रष्ट कारभारातून बेहिशोबी मालमत्ता गोळा करण्याच काम भाजप पदाधिका-यांनी केलेले आहे.
महापालिकेच्या प्रत्येक विभागात मनमानी पध्दतीने निविदा प्रक्रिया राबविल्या आहेत. करोडो रुपयाची कामे आपआपल्या मर्जीतील ठेकेदारांना दिल्या आहेत. अनेक ठिकाणी रिंग करुन नेत्यांच्या नातेवाईकांना कामे मिळवून दिलेली आहेत. काही कामे थेट पध्दतीने देवून मलिदा लाटण्याचा प्रकार केला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजप महापालिका चाटून पुसून खाण्यासाठीच सत्तेत आल्याचे दिसून येत आहे.
भाजप सत्तेत आल्यानंतर बोगस एफडीआर प्रकरणात काहीच ठेकेदारांवर कारवाई केली. पण काहींना सहीसलामत बाहेर काढले आहे. रस्ते साफसफाई कामात कंत्राटी महिलांच्या वेतनावर डल्ला मारुन भाजप धार्जिणी ठेकेदारांनी करोडोचा भ्रष्टाचार केला. पवना व इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पात दीडशे कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. त्या प्रकल्पात कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला आहे. त्यामुळे भाजप आणि भ्रष्टाचार जणू समीकरणच बनले आहे.
दरम्यान, महापालिकेतील साडेचार वर्षात भाजप पदाधिका-यांना सत्तेतून बेहिशोबी मालमत्ता कमवण्याचा जणू सपाटाच लावला आहे. त्याच्या मागील सर्व प्रकरणाची कुंडली आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देवून गैरकारभाराची चाैकशी करण्याची मागणी करणार आहे, असेही भोसले यांनी सांगितले आहे.
भाजपच्या सत्तेत भ्रष्टाचाराची मालिका..
कचरा प्रक्रियेत रिंग करुन पिंपरी-चिंचवडची उत्तर-दक्षिण अशी कारभा-यांनी वाटणी करत भ्रष्टाचार केलाय. रस्ते साफसफाईच्या कामात मर्जीतील ठेकेदारांना कामे देत भ्रष्टाचार केलाय. पंतप्रधान आवास योजनेत भ्रष्टाचार झालाय, वेस्ट टू एनर्जी प्रकल्प भ्रष्टाचार, 420 कोटीच्या रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार, कचरा डेपोतील बायोमायनिंग प्रकल्प गैरव्यवहार, पवना नदी दोन बनावट पुररेषा नकाशा प्रकरण, सिमेंट रस्त्यांच्या कामात झोल, शितलबाग पादचारी पुलाचा झोल, एसटीपी प्रकल्पाच्या कामात झोल, एफएसआय, टीडीआर प्रकरण भ्रष्टाचार, झोपडपट्टी पुर्नवसन प्रकल्पात झोल यासह अन्य विविध विभागाच्या कामात अनागोंदी कारभार झाला आहे. सर्व कामाची चैकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहे.
भाजप नेत्यांकडून स्मार्ट चो-या…
सत्ताधारी भाजपच्या नेत्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पात स्मार्ट दरोडा टाकण्याचे काम केले आहे. शेकडो कोटीची कामे उपठेकेदार म्हणून मर्जीतील व नातेवाईकांना दिल्याची चर्चा आहे.. स्मार्ट सिटी प्रकल्पात देखील शेकडो कोटीचा महाघोटाळा झालेला आहे. त्यात भाजप कारभा-यांचा चांगलाच हात धुवून घेतला आहे.