पिंपरी (19 ऑगस्ट 2021) :- पिंपरी नेहरु नगर येथिल अण्णासाहेब मगर स्टेडियमचे खासगीकरण केल्यास कामगार नगरीतील कामगारांचा तीव्र लढा उभारु असा इशारा कामगार नेते डॉ. कैलास कदम यांनी दिला.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांना दिलेल्या पत्रात डॉ. कदम यांनी पुढे म्हटले आहे की, महानगरपालिका व महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ यांच्यामध्ये 1992 साली करार झाला होता. त्यानुसार महानगरपालिकेने अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मोबदल्यात कामगार कल्याण मंडळास 5 कोटी रुपये आणि शहरात पाच ठिकाणी भूखंड द्यावेत असे ठरले होते. या करारातील अनेक अटींची अद्यापही पुर्तता झालेली नाही. या ठिकाणी शहरातील कामगार आणि त्यांच्या कुटूंबियांना क्रीडा सुविधा उपलब्ध करुन देणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. महानगरपालिका प्रशासन मात्र आपली जबाबदारी टाळून या स्टेडियमचे खासगीकरण करण्याचे नियोजन करीत आहे.

स्टेडियमच्या या भूखंडाचे खासगीकरण करुन भांडवलदारांच्या घशात घालण्याचा घाट मनपा प्रशासन बेकायदेशीररीत्या करीत आहे. शहरातील कष्टकरी कामगार व त्यांच्या कुटुंबियांच्या हितासाठी करण्यात आलेल्या या करारानुसार महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळास 5 कोटी रुपये व शहरात पाच भूखंड मिळणे अपेक्षित होते. पिंपरी 1992 मध्ये स्टेडियम ताब्यात घेतल्यापासून आजतागायत मनपाकडून स्टेडियमच्या विकसनासाठी कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेले नाही. कोरोनाच्या महामारीच्या काळात कामगारांचा विश्वासघात करीत स्टेडियम पाडण्यात आले. आता हा भूखंड पीपीपी तत्वावर खासगी कंपनीला देण्याचा घाट घातला जात आहे. शहराच्या मध्यवर्ती असणा-या 28 एकर जागेत मनपा प्रशासनाने कामगारांना विविध सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. ही अनेक वर्षांची हजारो कामगारांची प्रलंबित मागणी असताना याकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करुन प्रशासनातील काही अधिकारी व पदाधिकारी बेकायदेशीररीत्या कामगारांचा न्याय हक्क डावलून अन्याय करीत आहे. अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या खासगीकरणाचा निर्णय आयुक्तांनी स्व:ताच्या अधिकारात रद्द करावा अन्यथा कामगारांच्या वतीने तीव्र आंदोलन करु असा इशारा कामगार नेते डॉ. कैलास कदम यांनी दिला आहे.
——————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *