एकाच कामासाठी दोन निविदा काढून सत्ताधा-यांचा लुटीचा डाव

१२२ कोटींची निविदा रद्द करण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

पिंपरी चिंचवड (प्रतिनिधी) : अमृत योजनेअंतर्गंत केंद्र सरकार आणि राज्य सरकारमार्फत महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून दिला जातो. परंतु ही अमृत योजना पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचाराचे कुरण बनल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सत्ताधारी भाजपच्या भ्रष्टाचारी आणि अपारदर्शी यंत्रणेमुळे अमृत योजनेतील ड्रेनेज व्यवस्थेचे १४८ कोटींचे काम बारगळले आहे. तेच काम पूर्ण करण्यासाठी आणखी १२२ कोटी रुपयांचे काम काढण्यात आले आहे.  एकाच कामासाठी दोन वेळा खर्च करून महानगरपालिकेची आर्थिक लूट करण्याचा डाव सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी केला आहे.

या संदर्भात संजोग वाघेरे पाटील यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, अटल मिशन योजनेअंतर्गंत पिंपरी-चिंचवड महापालिकेने १४८ कोटी रुपयांची काम पिंपरी चिंचवड शहरात जुन्या सांडपाणी नलिका काढून तेथे नवी नलिका टाकणे आणि चिखली, बोपखेल आणि पिंपळे निलख येथे तीन एसटीपी प्रकल्प उभारण्याचे नियोजन केले. पिपरी चिंचवड महानगरपालिकेची सत्ता मिळाल्यानंतर पारदर्शक कारभाराचा बोलबाला करत पहिल्या वर्षी सत्ताधा-यांनी याची निविदा काढली होती. तर हे काम २०१८ मध्ये प्रत्यक्षात सुरू झाले होते. तेव्हापासून दरवर्षी १२ महिने शहरात खोदाई चालू असताना मुदतीत हे काम पूर्ण करता आलेले नाही. या कामावर सव्वाशे कोटींहून अधिक खर्च झालेला असताना काम अर्धवट स्थितीत आहे. महानगरपालिकेच्या ड्रेनेज विभागाने हे काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानंतर १४८ कोटी रुपयांच्या निविदेत समाविष्ट असलेली सांडपाणी नलिका टाकणे व एसटीपी उभारण्याच्या कामसााठी आणखी १२२ कोटी रुपयांची निविदाप्रक्रिया सुरू केलेली आहे. पिंपरी चिंचवड शहरवासीयांच्या डोळ्यात धुळफेक करणारा हा सर्व प्रकार आहे. या आधीच्या निविदेत प्रचंड भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याचा संशय या प्रकारावरून निर्माण होत आहे. एकाच कामासाठी दोन निविदा काढून महानगरपालिकेची तिजोरी लुटण्याचा हा डाव दिसतो आहे. या कारणाने तात्काळ ही चालू निविदाप्रक्रिया रद्द करावी. तसेच ड्रेनेज विभागाने अमृत योजनेअंतर्गंत केलेल्या संपूर्ण प्रकल्पाची सखोल चौकशी करण्यात यावी आणि संबधित दोषी आढळणा-या सर्व संबधितांवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसची अल्याचे संजोग वाघेरे पाटील यांनी म्हटले आहे.

-पिंपरी चिंचवडमध्ये भाजपकडून ‘अटलजीं’चा अनादर

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान आदरणीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने ही अमृत योजना सुरू करण्यात आली. ‘अटल नवीकरण और शहरी परिवर्तन मिशन’ असा या योजनेचा उल्लेख होतो. राजकारणाच्या पलिकडे जाऊन अटलजींबद्दल सर्वच पक्षातील नेते, कार्यकर्त्यांना आदर आहे. परंतु त्यांच्या नावाने असलेल्या योजनेत त्यांच्याच पक्षातील मंडळींकडून गैरकारभार होत असेल आणि भ्रष्टाचाराला प्रोत्साहन दिले जात असेल, तर हा एकप्रकारे त्यांचा देखील अनादर आणि अवमान म्हणावा लागेल. याचे तरी भान पिंपरी चिंचवडच्या भाजपवाल्या मंडळींनी ठेवावे, अशी अपेक्षा  संजोग वाघेरे पाटील यांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *