पिंपरीतील व्यापा-यांवरील प्रतिबंध न उठविल्यास सोमवारपासून पुर्णवेळ दुकाने खुली ठेवणार…..श्रीचंद आसवाणी
पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचा लॉकडाऊन विरोधात मोर्चा
पिंपरी (दि. 4 ऑगस्ट 2021) पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना पॉझिटीव्हीटीचा दर चार टक्यांहून कमी झाला आहे. तरी देखिल व्यापा-यांना दुकाने पुर्णवेळ उघडण्यास प्रतिबंध केला आहे. दुकाने सायंकाळी आठ वाजेपर्यंत उघडण्यास मुंबई प्रमाणे परवानगी द्यावी हि व्यापा-यांची मागणी रास्त आहे. याबाबत आपण शुक्रवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबरच्या पुण्यातील बैठकीत व्यापा-यांवरील प्रतिबंध उठविण्याची आग्रही मागणी करु असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड मनपाच्या महापौर माई ढोरे यांनी केले.
पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी (दि. 4 ऑगस्ट) पिंपरी शगून चौक ते मनपाभवन पर्यंत मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर शिष्टमंडळाने महापौर माई ढोरे, आयुक्त राजेश पाटील यांना आपले निवेदन दिले. यावेळी स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, माजी नगरसेवक हरेश बोधानी, अतिरीक्त आयुक्त विनायक ढाकणे आदी उपस्थित होते. या आंदोलनात माजी नगरसेवक हरेश बोधानी तसेच निरज चावला, प्रकाश लखवाणी, रोमी संधू, नरेंद्र पोपटानी, प्रकाश रतनानी आणि व्यापारी सहभागी झाले होते.
पिंपरी मर्चंन्ट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवाणी म्हणाले की, यापुर्वी पिंपरी चिंचवडची कोरोना पॉझिटीव्हीटीची टक्केवारी 5.2 टक्के असताना पुणे शहराला सवलत देण्यात आली. आता पिंपरी चिंचवड शहराची टक्केवारी चारपेक्षा कमी असतानाही पिंपरी चिंचवड शहराला सवलत का दिली जात नाही. हा पिंपरीतील व्यापा-यांवर अन्याय आहे. शुक्रवारच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा सोमवार पासून पिंपरीतील सर्व व्यापारी पुर्ण वेळ दुकाने उघडी ठेवतील. व्यापारी आता अधिका-यांच्या दंडेलशाहीला कंटाळले आहेत. कोरोना मार्शल म्हणून नेमण्यात आलेले कर्मचारी व्यापा-यांना नाहक त्रास देतात. आम्हाला अधिका-यांनी पावत्या फाडण्याचे टारगेट दिले आहे असे सांगून दंडात्मक कारवाई करतात. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे सर्व व्यापारी दुकानाचे भाडे, कामगारांचे पगार, बँकांचे हप्ते, शासनाचे कर भरण्यास असमर्थ आहेत. व्यापा-यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. याचा शासनानेही गांभिर्याने विचार करावा, अशीही मागणी श्रीचंद आसवाणी यांनी केली आहे.
यावेळी आयुक्त म्हणाले की, ज्या जिल्ह्यात कोरोना पोझिटीव्हीटीचा दर पाच टक्यांहून जास्त आहे. त्या जिल्ह्यांमध्ये शनिवारी, रविवारी दुकाने बंद आणि इतर दिवशी चार वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी आहे. याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. नियमभंग करणा-यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. व्यापा-यांनी नियम पाळावेत असेही आवाहन आयुक्त पाटील यांनी केले.
———————————