पिपंरी, पुणे (दि. 30 जुलै 2021):- मी पुन्हा येईन अशी दर्पोक्ती करणा-यांना मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी आडवे केले आहे. भविष्यातील ही अशी आव्हाने मुख्यमंत्री पेलणार आहेत. गल्ली बोळातील शिवसैनिक ही शिवसेनेची ताकत आहे. कोरोनामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे. रिक्षावाले, फेरीवाले अशा सर्व सामान्य नागरीकांना मदत देण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले आहे. त्यांचा टिव्ही वरील संवाद सर्वांना आपला जिव्हाळ्याचा वाटतो असे प्रतिपादन शिवसेना उपनेते व विभागीय समन्वयक रविंद्र मिर्लेकर यांनी केले.
राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिक संतोष वाळके, शिवसेना दिघी शाखा आणि कै. तानाजी सोपानराव वाळके व कै. सुजाता एकनाथ वाळके प्रतिष्ठान यांच्या वतीने गुरुवारी (दि. 29 जुलै) महायज्ञ रक्तदान शिबीराचे आयोजन दिघी येथे करण्यात आले होते. यावेळी झालेल्या लकी ड्रॉ मधिल विजेत्यांना मिर्लेकर यांच्या हस्ते बक्षिस देण्यात आले. तसेच सहभागी होणा-या प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट, दहा लिटर पाण्याचा जार किंवा स्पिकर फोन यापैकी एक वस्तू भेट देण्यात आली. रक्तदात्यांमधील लकी ड्रॉ मधिल पाच भाग्यवान विजेत्यांना एलसीडी टिव्ही, फ्रीज, मिक्सर, टेबल फॅन, ओव्हन बक्षिस म्हणून देण्यात आले.
यावेळी संपर्क प्रमुख माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आयोजक संतोष वाळके, कामगार नेते इरफान सय्यद, भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, भोसरी विधानसभा उपशहर प्रमुख ॲड. कुणाल तापकीर, उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके, भोसरी विधानसभा संघटक आबा लांडगे, भोसरी विधानसभा संघटक तुषार सहाणे, भोसरी विधानसभा संघटक सचिन सानप, खेड विधानसभा सहसंपर्क प्रमुख अशोक खांडेभराड, शिवसैनिक कृष्णा वाळके, ज्ञानेश्वर आण्णा वाळके, भाऊसाहेब काटे, अविनाश लोणारे, कैलास कुदळे, मनोज परांडे, प्रियशील पोटभरे, कैलास तापकीर, सागर रहाणे, गौरव आसरे, ज्येष्ठ शिवसैनिक ज्ञानेश्वर वाळके तसेच सामाजिक कार्यकर्ते नवनाथ परांडे, सचिन महाजन, प्रभाकर कदम, गौरव आसरे, प्रशांत निबांळकर, संदिप वाळके, दिवेश सकपाळ, बापू परांडे, सुमित येडगे, नितीन परांडे, सुरज वाळके, एकनाथ वाळके, प्रशांत कुराडे, राहुल ववले, निलेश वाळके, हनुमंत खराबे, प्रदिप तुपे आदी उपस्थित होते.
यावेळी मिर्लेकर म्हणाले की, हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना सामाजिक बांधिलकीतून केली. ते नेहमी सांगायचे आपण सामाजिक बांधिलकीचे भान ठेऊन काम केले पाहिजे. या कोरोना काळात मुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत संतोष वाळके यांनी रक्तदान शिबीराचे भव्य आयोजन केले. त्याला मिळालेला प्रतिसाद आश्चर्यजनक व इतरांना प्रेरणादायी आहे. यातून जिव्हाळ्याचं नातं निर्माण होणार आहे. सलग तीन वेळा खासदार म्हणून निवडून येणा-या शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात कोण तरी नाटकवाला उभा राहतो आणि निवडून येतो. आढळरावांचा हा पराभर उध्दव ठाकरे यांनाही जिव्हारी लागला आहे. उद्याचे शिरुरचे खासदार आढळरावच असतील. यासाठी भोसरी विधानसभेतून त्यांना आघाडी मिळाली पाहिजे. यासाठी मी स्व:ता लक्ष घालणार आहे असेही शिवसेना उपनेते व विभागीय समन्वयक रविंद्र मिर्लेकर म्हणाले.
शिवसेना उपनेते व संपर्क प्रमुख माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, 2004 ला मी जेंव्हा प्रथम खासदार म्हणून निवडून आलो त्या दिवशी सर्वात प्रथम माझा सत्कार दिघीमध्ये झाला. परंतू आता दुर्दैवाने भोसरी मतदार संघात एकही नगरसेवक नाही. तरी देखिल येथिल शिवसैनिक झपाटून कामाला लागले आहते. कायम सामाजिक उपक्रमांचे उत्तम आयोजन करणा-या संतोष वाळके याने तर दिघी भागात घरोघरी शिवसेनेचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण केले आहे. नागरिकांच्या मदतीला धावून जाणा-यांना जनता विसरणार नाही. अशा शिवसैनिकांच्या मागे पक्ष निश्चित उभा राहिल असेही आढळराव पाटील म्हणाले.
प्रास्ताविक कृष्णा वाळके, स्वागत संतोष वाळके, सुत्रसंचालन अक्षय मोरे आणि आभार सागर रहाणे यांनी मानले.
—————————-