-पिंपरी-चिंचवडमधील बाप-लेकीचा जागतिक विक्रम
-पिंपरी-चिंचवडकरांसाठी अभिमानास्पद कामगिरी
-भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले कौतुक
पिंपरी :- महाराष्ट्राला अभिमान वाटावा आणि पिंपरी-चिंचवडकरांची मान देशात उंचवावी अशी कामगिरी भोसरीतील बाप-लेकीने करुन दाखली आहे. युरोप खंडातील सर्वांत उंच मानले जाणारे माउंट एल्ब्रुस ज्याची उंची तब्बल ५ हजार ६४२ मीटर इतकी आहे. हे शिखर सर करण्याची धाडसी मोहीम १२ वर्षीय गिरीजा लांडगे आणि तिचे वडील धनाजी लांडगे यांनी यशस्वी केली आहे. हे शिखर सर करणारी गिरीजा ही भारतातील पहिली मुलगी आहे असा दावा गिरिजाच्या वडिलांनी केला आहे.
माउंट एल्ब्रुस हे युरोप खंडातील सर्वोच्च शिखर मानले जाते. निद्रिस्त ज्वालामुखी म्हणूनही या पर्वताला ओळखले जाते. तेथील तापमान उणे २५ ते ४० डिग्रीपर्यंत असते. ‘माउंट एल्ब्रुस ‘ सर करण्यासाठी योग्य प्रशिक्षण, मेहनत आवश्यक असते. गिर्यारोहकांच्या मनाचा अंत पाहणारा पर्वत ओळखला जातो. प्रचंड थंडी आणि वाऱ्याचे घोंगावणारे झोत अशा वातावरणाचा प्रसंगी सामना करावा लागतो. येथील वातावरण सतत बदलते असते. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक तयारी करूनच या मोहिमेची निवड करावी लागते, या सर्व संकटांचा सामाना करीत या बाप-लेकीने भगवी पताका माउंट एल्ब्रुसवर फडकावली आहे.
गिरीजाचे वडील धनंजय लांडगे म्हणाले की, शिखरावर चढाई करणारी गिरीजा महाराष्ट्रातील व भारतातली पहिलीच मुलगी आहे. एकूण १० दिवसांच्या मोहिमेत गिरीजा आणि मी आज सकाळी सात वाजता समिट सक्सेस केले. आम्ही १५ तासांत माउंट एल्ब्रुस पूर्व आणि पश्चिम या दोन्ही बाजुने असणाऱ्या मार्गांनी समिट करण्याचा प्रयत्न केला. मात्र वातावरण खराब असल्याने दोन्ही बाजूने समिट सक्सेस झाला नाही. ५६४२ मीटर पश्चिम बाजूने समिट सक्सेस करणारे जगातील पहिली बाप- लेकीचे जोडी आम्ही ठरलो आहे. या मोहिमेतून आम्ही ‘लेक वाचवा, लेक जगवा’ हा संदेश देत आहोत.
गिरीजाची आतापर्यंची कामगिरी लक्षवेधी…
गिरीजाने आत्तापर्यंत सह्याद्रीतील लिंगाणा, वजीर, तैलबैल, नागफणी, कळकराय, संडे-१, संडे-२, वानरलिंगी असे अवघड सुळके सर केले आहेत. त्याबरोबर नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ६५ किल्ल्यांवर भटकंती केली आहे.तिच्या लिंगाणा, वजीर या सुळक्यांवर केलेल्या चढाईची युनिक बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स व इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये यंगेस्ट माउंटेनिअर म्हणून नोंद झालेली आहे.