पार्कींग धोरण त्वरित मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल

पिंपरी (प्रतिनिधी) – कोरोनाची तिसरी लाट उंबरठ्यावर असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपने शहरातील नागरिकांसाठी ‘पे अँड पार्क’ हे धोरण अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दीड वर्षापासून लाकडाऊनमूळे नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. अशा परिस्थितीत ‘पे अँड पार्क’ धोरण लागू करुन सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्यांच्या खिशातून खंडणी उकळण्याचा उद्योग चालवला आहे. हे धोरण त्वरित थांबवण्यात यावे, अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी दिला आहे आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधारी शहरातील नागरिकांना वेठिस धरण्याचे काम करत आहे. कोरोनाच्या महामारीने शहरातील सर्वसामान्य अगोदरच मेटाकुटीस आलेले आहेत. अनेकांचे रोजगार गेले आहेत. नागरिकांना रोजच्या जगण्याची भ्रांत पडलेली आहे. मिळेल तिथे काम करून सर्वसामान्य लोक पोट भरत आहेत. एका बाजूला ही स्थिती असताना दुसऱ्या बाजूला सत्ताधारी महापालिकेत भ्रष्टाचाराची मालिकाच करत सुटली आहे. महापालिका म्हणजे चरण्याचे कुरण असल्याचा अविर्भाव त्यांचा आहे. कोट्यावधीचे अनेक निरुपयोगी प्रकल्प राबवून केवळ स्वतःचा व आपल्या नातलगांचा खिसा भरण्याचे काम ते करत आहेत.

त्यामध्येच सत्ताधाऱ्यांनी नुकतेच पे अँड पार्किंग धोरणाचा अवलंब केला आहे. या धोरणाला शहरातून अनेक वेळा विरोध झालेला आहे. असे असताना देखील स्वतःचे ठेकेदार पोसण्याकरिता सत्ताधारी या धोरणाचा घाट घालत असल्याचा आरोप लांडे यांनी केला. सत्ताधाऱ्यांच्या या धोरणाविरोधात सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र नापसंती व रोष पसरलेला आहे. सर्वसामान्यांचे होणारी ही लुबाडणूक त्वरित थांबून पे अँड पार्किंगचे धोरण कायमस्वरूपी रद्द करावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्थ दादा पवार विचार मंचच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना घेऊन महापालिकेवर तीव्र निषेध मोर्चा काढण्यात येईल, असा खणखणीत इशारा माजी आमदार विलास लांडे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *